Chhaava Movie : विकी कौशलसाठी सोप्पा नव्हता 'छावा' बनण्याचा प्रवास, सेटवरून जखमी होऊन जायचा घरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 12:43 IST2025-02-28T12:39:55+5:302025-02-28T12:43:33+5:30
Vicky Kaushal's Chhaava Movie :बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या छावा या चित्रपटामुळे सर्वत्र चर्चेत आहे. १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जगभरात चांगलीच कमाई केली आहे. हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या छावा या चित्रपटामुळे सर्वत्र चर्चेत आहे. या चित्रपटाने प्रदर्शित होताच मोठ्या पडद्यावर खळबळ उडवून दिली. १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जगभरात चांगलीच कमाई केली आहे. हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
छावा हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित असून, त्याला चाहत्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. अभिनेत्याच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा हिट चित्रपट बनला आहे, ज्यामध्ये त्याच्या शानदार अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत.
सगळेच विकी कौशलचे कौतुक करत आहेत. त्याच्या दमदार अभिनयाला खूप पसंती दिली जात आहे. या चित्रपटात त्याने तलवारबाजी, घोडेस्वारी आणि आपल्या सैन्याचे मनोधैर्य उंचावण्याचा अभिनय उत्तम प्रकारे केला आहे.
विकी कौशलसाठी हे अजिबात सोपं नसलं, तरी ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी त्याने रात्रंदिवस मेहनत घेतली. ज्याचा उत्तम परिणाम त्याला अनुभवायला मिळत आहे.
विक्की कौशलने छावा सिनेमासाठी वजन वाढवले आणि तासन् तास घाम गाळून या भूमिकेसाठी स्वत:ला तयार केले.
मॅडॉक फिल्म्सने छावा सिनेमाचा ऑफस्क्रीन व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेता स्वतः सांगत आहे की मोठ्या पडद्यावर छावा बनणे त्याच्यासाठी सोपे नव्हते. ६ महिने घोडेस्वारी आणि तलवारबाजीचा सराव आणि रोज ८ तास घाम गाळल्यानंतरच तो या भूमिकेसाठी स्वत:ला फिट करू शकला.
चित्रपटाच्या सेटवर तलवारीने मारामारी केल्यानंतर त्याला खूप थकवा जाणवत होता आणि त्याच्या शरीरावर तलवारीच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या, असा खुलासा त्यानेच केला आहे.
त्याने पुढे सांगितले की जेव्हा त्याने या व्यक्तिरेखेसाठी स्वतःला तयार केले होते. तेव्हा लक्ष्मण उतेकर यांनी मला माझा छावा सापडल्याचे म्हटले होते. त्याचा अभिनयही प्रेक्षकांना खूप आवडतो आहे. चित्रपटाला भरभरून प्रेम मिळत आहे.