Rs 1000 New Note: 1 जानेवारीपासून 1000 रुपयांची नवी नोट चलनात? सरकारने दिली मोठी अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 12:51 PM2022-12-21T12:51:09+5:302022-12-21T12:58:03+5:30

खरेतर २००० रुपयांच्या नोटा बाजारात खरेदीसाठी गेल्यास सुट्टेच मिळत नसल्याने ग्राहकांना एकतर जास्तीची खरेदी करावी लागत होती, किंवा ती नोट घेऊन हेराफेरीतल्या अक्षय कुमारसारखे दारोदारी हिंडावे लागत होते (सिनेमातला गंमतीचा भाग).

गेल्या काही महिन्यांपासून २००० रुपयांच्या नोटा बाजारातून अचानक गायब झाल्या आहेत. यातच सोशल मीडियावर नवीन वर्षात मोदी सरकार १००० रुपयांची नवीन नोट जारी करणार असल्याचे वृत्त व्हायरल होऊ लागले आहे. यामुळे दोन हजार रुपयांच्या नोटा बंद होणार व नवीन १००० रुपयांच्या नोटा बाजारात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

खरेतर २००० रुपयांच्या नोटा बाजारात खरेदीसाठी गेल्यास सुट्टेच मिळत नसल्याने ग्राहकांना एकतर जास्तीची खरेदी करावी लागत होती, किंवा ती नोट घेऊन हेराफेरीतल्या अक्षय कुमारसारखे दारोदारी हिंडावे लागत होते (सिनेमातला गंमतीचा भाग). एटीएममधूनही अनेकदा दोन हजाराच्याच नोटा बाहेर येत होत्या. या नोटा बाजारातूनच गायब झाल्याने त्यांचे काय झाले? या प्रश्नासोबतच या नोटा बंद होण्याच्याही अफवा पसरल्या होत्या.

सरकारने यावर स्पष्टीकरण देताना 2018-19 नंतर या २००० रुपयांच्या नोटांची नवीन मागणी टांकसाळीला देण्यात आलेली नसल्याचे म्हटले होते. म्हणजेच या नोटांची छपाई थांबविण्यात आली होती. परंतू, या नोटा बाजारातही दुर्मिळ झाल्या आहेत.

आता या नोटा बंद करून १ हजाराच्या नव्या नोटा सुरु करण्यात येणार असल्याचा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. यातल्या दाव्यानुसार १ जानेवारी २०२३ पासून १००० रुपयांच्या नोटा पुन्हा बाजारात येणार आहेत असे म्हटले आहे. याचबरोबर २००० रुपयांच्या नोटा पुन्हा बँकांद्वारे माघारी घेतल्या जाणार आहेत, असे सांगितले गेले आहे.

नव्या १००० रुपयांच्या नोटा बाजारात येणार असल्याचा जो दावा केला जात आहे तो चुकीचा आहे. २००० रुपयांच्या नोटा माघारी घेणे आणि नवीन १००० रुपयांच्या नोटा बाजारात आणण्याची सरकारची कोणताही योजना नाहीय. सरकारने २०१६ मध्ये नोटबंदीवेळी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्या होत्या. त्या बदल्यात नवीन ५०० च्या आणि २००० रुपयांच्या नोटा आणल्या होत्या.

केंद्र सरकारची अधिकृत फॅक्ट चेकर एजन्सी पीआयबी फॅक्ट चेकने लोकांना १००० रुपयांच्या नव्या नोटा येणार नसल्याचे म्हटले आहे. जो व्हिडीओ व्हायरल होत आहे तो खोटा आहे. यामुळे अशाप्रकारचे मेजेस पुढे पाठवू नयेत, असे पीआयबीने म्हटले आहे. तसेच २००० रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा देखील सरकारने निर्णय घेतलेला नाही, असे पुन्हा सांगण्यात आले आहे.

बनावट नोटांच्या चलनाबाबत माहिती देताना, अर्थ मंत्रालयाने राज्यसभेत उत्तर दिले की, 2021-22 या आर्थिक वर्षात बँकिंग प्रणालीमध्ये 2,30,971 बनावट नोटा आढळून आल्या आहेत. यामुळे बनावट नोटा देखील बाजारात आहेत.