नान बनवताना भाकऱ्यांवर थुंकत होता कामगार, व्हिडीओ व्हायरल होताच....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 11:45 PM2021-03-13T23:45:25+5:302021-03-13T23:50:40+5:30

Workers were spitting on bread while making naan : सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, या घटनेची दखल घेत पोलिसांनी आरोपीची ओळख पटवत त्याला अटक केली आहे.

काही दिवसांपूर्वी मेरठमध्ये नान बनवताना त्यावर थुंकणाऱ्या कारागीराचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता गाझियाबागमध्येही असा प्रकार घडल्याचे उघड झाले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, या घटनेची दखल घेत पोलिसांनी आरोपीची ओळख पटवत त्याला अटक केली आहे.

हा प्रकार गाझियाबादमधील भोजपूर ठाणे क्षेत्रात घडला आहे. गेल्या गुरुवारी येथील एका शाळेच्या परिसरात साखरपुड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात जेवन बनवत असलेला कामगार नान बनवताना भाकऱ्यांवर थुंकत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर लोकांनी याबाबत मोदींपासून योगींपर्यंत ट्विट करत या प्रकरणाची तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या कामगाराचे नाव मोहसिन आहे. तो मुरादनगर परिसरातील राहणारा आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये जेवण बनवणारा कामगार आणि त्याचा सहकारी तंदूरवर नान बनवताना दिसत आहे. नान बनवताना एक कामगार प्रत्येक नान बनवताना त्यावर थुंकी लावताना दिसत आहे. त्याचदरम्यान एका व्यक्तीने त्याचा व्हिडीओ शूट केला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कार्यक्रमाच्या आयोजकांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.

याबाबत एसपी ईराज राजा यांनी सांगितले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून एका व्यक्तीने गाझियाबाद पोलिसांना एका साखरपुड्याच्या कार्यक्रमात थुंकी लावून नान बनवत असल्याच्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर आरोपीची ओळख पटवून त्याच्यावर विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले.

हा व्हिडीओ त्याच प्रकारचा आहे ज्या प्रकारे काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील मेरठ येथील व्हिडीओ व्हायरल झाला होता. दरम्यान, पोलिसांना तपासामध्ये दोन्ही आरोपींमध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध असल्याची माहिती मिळालेली नाही.