आफताबला देणार ट्रूथ ड्रग; काय आहे हे केमिकल?; थोडीशी चूक झाली तरी जीवच जातो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 06:08 PM2022-11-17T18:08:09+5:302022-11-17T18:10:24+5:30

श्रद्धा वालकर हत्येतील आरोपी आफताब अमीनच्या प्रकरणात पोलीस तपासात गुंतले आहेत. खरे तर हा गुन्हा इतक्या चतुराईने केलाय की घटनेचे पुरावे गोळा करण्याचं पोलिसांसमोर आव्हान आहे. या हत्याकांडातील आरोपीने खुनाची कबुली दिली आहे, मात्र कोर्टात तो पलटला तर केसवरच त्याचा परिणाम होईल.

त्यामुळेच या घटनेतील सत्य शोधण्यासाठी नार्को टेस्ट करण्याची शक्यता आहे. मग नार्को टेस्टमुळे एखाद्या क्रूर खुनीही सत्य पटकन बाहेर बोलतो का? जर होय, तर सर्वोच्च न्यायालयाने त्यावर स्थगिती देण्याचे कारण काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

अनेकदा अत्यंत घृणास्पद घटना करणाऱ्यांचे मनही तितकेच गोंधळलेले असते. त्यांना पोलीस पकडतात, पण त्यांचा गुन्हा सिद्ध करणे सोपे नसते. पुराव्याअभावी न्यायालयाकडेही आरोपींना सोडण्याशिवाय पर्याय नसतो

अशा परिस्थितीत अवघड प्रकरणे सोडवण्यासाठी नार्को टेस्टची मदत घेण्यात येते. यामध्ये आरोपीला नसांमध्ये इंजेक्शन दिले जाते, ज्यामुळे तो सर्व सत्य बाहेर बोलतो. हे सर्व अर्ध बेशुद्ध अवस्थेत घडते. भीतीदायक वाटणाऱ्या या चाचणीअंतर्गत इंजेक्शनमध्ये एक प्रकारचे सायकोअ‍ॅक्टिव्ह औषध मिसळले जाते, ज्याला ट्रूथ ड्रग असेही म्हणतात.

त्यात सोडियम पेंटोथल नावाचं केमिकल असते, जे शिरांमध्ये जाताच व्यक्ती काही मिनिटांपासून ते बराच काळ बेशुद्धावस्थेत जातो. हे डोसवर अवलंबून असते. यानंतर, जागे असताना तो अर्ध बेशुद्ध अवस्थेत बिनदिक्कतपणे सर्व सत्य सांगतो.

वाचायला आणि ऐकायला सोपी वाटणारी ही टेस्ट खूप घातक आहे. थोडीशी चूक झाली तर माणूस मरू शकतो, कोमात जाऊ शकतो किंवा आयुष्यभरासाठी अपंग होऊ शकतो. अमेरिकन तुरुंगात चौकशीदरम्यान अनेक कैद्यांचा मृत्यू झाला. यानंतर या औषधावर प्रश्न उपस्थित होऊ लागले.

अखेरीस, जवळजवळ प्रत्येक देशात नार्को चाचणीवर बंदी घालण्यात आली. होय, एखाद्या विशिष्ट प्रकरणात न्यायालयाने मान्यता दिली तरच हे करता येते. ही चौकशी ड्रग्जशी संबंधित असल्याने आणि घातक देखील असू शकते, या चाचणीच्या वेळी तज्ज्ञांची संपूर्ण टीम उपस्थित असते.

यात भूलतज्ज्ञ, डॉक्टर, मेडिसिन एक्सपर्ट आणि मानसशास्त्रज्ञ तसेच पोलीस अधिकारी यांचा समावेश आहे. तसेच नार्कोचे इंजेक्शन देण्यापूर्वी आरोपीची वैद्यकीय तपासणी केली जाते, जेणेकरून तो कोणत्या मोठ्या आजाराचा बळी आहे की नाही हे कळू शकेल.

आरोपीला अवयव, मानसिक किंवा कर्करोगाशी संबंधित कोणताही आजार असल्यास ही चाचणी करता येत नाही. अल्पवयीन व्यक्तीचीही नार्को चाचणी होऊ शकत नाही. आपल्या देशात, २०१० मध्ये, सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने, ज्यामध्ये मुख्य न्यायाधीश केजी बालकृष्णन यांचाही समावेश होता, त्यांनी नार्कोसह ब्रेन मॅपिंग आणि पॉलीग्राफला बेकायदेशीर घोषित केले आहे.

तसे, आफताब खरोखरच खुनी असेल, तरी नार्को चाचणीनंतरही सत्य कळणे पोलिसांना सोपे जाणार नाही, अनेक नराधम गुन्हेगार ड्रग्ज घेऊनही खोटे बोलू शकतात. आपल्या देशात अनेक प्रकरणांमध्ये पोलिसांना सत्य की खोटे याचा निर्णय घेता आला नाही.