Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 18:27 IST2025-07-01T18:09:10+5:302025-07-01T18:27:26+5:30
Raja Raghuwanshi : सोनम रघुवंशीला सासरच्यांनी लग्नात १६ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने दिल्याचे उघडकीस आल्यानंतर तपासात एक नवीन वळण आलं.

राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे तसतसे दररोज नवीन खुलासे होत आहेत. आता या प्रकरणात सोनम रघुवंशीला लग्नात दिलेल्या १६ लाख रुपयांच्या दागिन्यांबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. काही दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत, परंतु उर्वरित दागिने कुठे गेले हे कोणालाही माहिती नाही.
दागिन्यांसोबतच पोलिसांचं लक्ष आता आरोपी सिलोम जेम्सवरही आहे. असा आरोप आहे की, त्याने केवळ पुरावे लपवले नाहीत तर सोनमला मदतही केली. आता प्रश्न असा निर्माण होत आहे की, दागिन्यांसाठी राजाची हत्या झाली का? की या प्रकरणात आणखी काही मोठा कट आहे? याचा तपास सध्या सुरू आहे.
सोनम रघुवंशीला सासरच्यांनी लग्नात १६ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने दिल्याचे उघडकीस आल्यानंतर तपासात एक नवीन वळण आलं. राजाचा भाऊ विपिन रघुवंशी यांनी स्वतः याची पुष्टी केली आहे. पोलिसांना रतलाममधून काही दागिने सापडले असले तरी, बहुतेक दागिने अजूनही गायब आहेत.
विपिन रघुवंशी यांनी राजा आणि सोनम यांना त्यांच्या लग्नात भेट दिलेल्या सर्व दागिन्यांचे फोटो इंदूर गुन्हे शाखेत उपस्थित असलेल्या मेघालय पोलीस पथकाला दिले आहेत. लग्नाच्या वेळी राजाने जे दागिने घातले होते, ते त्याने सोनमच्या आग्रहावरून हनिमून ट्रिप दरम्यान देखील घातले होते. आता हेच दागिने हत्येनंतर गायब आहेत, ज्याचा पोलीस शोध घेत आहेत.
मेघालय पोलिसांनी रतलाम येथून इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह महत्त्वाचं साहित्य जप्त केलं आहे. पोलिसांनी लॅपटॉप जप्त केला, जो या प्रकरणात डिजिटल पुराव्याचा महत्त्वाचा सोर्स बनू शकतो. हा लॅपटॉप सोनमचा आहे. हे सर्व सामान रिअल इस्टेट एजंट सिलोम जेम्सच्या पत्नीच्या माहेरून जप्त करण्यात आलं. त्यामुळे संशयाची सुई थेट सिलोमकडे वळत असल्याचं दिसतं.
एसपी विवेक सीम म्हणाले की, जप्त केलेली कागदपत्रं आणि उपकरणं या प्रकरणाशी संबंधित कट उघड करू शकतात. आतापर्यंत सोनम, तिचा प्रियकर राज कुशवाह आणि त्याचे साथीदार विशाल, आकाश आणि आनंद यांना अटक करण्यात आली आहे.
सिलोम जेम्स हा पुरावे लपवण्याचा आणि नष्ट करण्याचा आरोप असलेल्या आरोपींमध्ये आहे. तपासाची दिशा आता डिजिटल उपकरण आणि दागिने जप्त करण्यावर केंद्रित आहे. पोलिसांनी लग्नाचे व्हिडीओ आणि फोटो मागितले आहेत जेणेकरून जप्त केलेले दागिने ओळखता येतील.
आता आरोपी सिलोम जेम्स पोलिसांच्या रडारवर आला आहे. तपासात असं दिसून आलं आहे की, सिलोमने सोनम आणि राज यांना लपण्यासाठी फ्लॅट मिळवून दिला, हत्येनंतर त्यांचं सामान सुरक्षित ठिकाणी पाठवलं होतं.
सोनमच्या सांगण्यावरून तो रतलामला गेला आणि दागिने लपवून ठेवले आणि या संपूर्ण कटात त्याचा सक्रिय सहभाग होता असा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे.
सोनमकडे दोन मंगळसूत्र होती. एक राजाने लग्नात घातलं होतं आणि दुसरे प्रियकर राज कुशवाहने दिलं होतं. यामुळे सोनमने हत्येपूर्वी राजशी लग्न केल्याचा संशय अधिकच बळावला आहे. हत्येनंतर सोनम ज्या फ्लॅटमध्ये लपली होती तिथून पोलिसांना ही दोन्ही मंगळसूत्र सापडली.
सिलोमच्या पत्नीने जबाबात असाही दावा केला आहे की, लोकेंद्र तोमरने सिलोमला धमकी दिली होती की जर त्याने बॅग गायब केली नाही तर त्याला डीलमधले तीन लाख रुपये परत मिळणार नाहीत. पैशाच्या लोभात सिलोमने ती बॅग रतलाम येथील सासरच्या घरी लपवून ठेवली.