अघोरी प्रकार... कोरोनामुक्तीसाठी दिला नरबळी ; शिर कापून देवाला केलं अर्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 13:00 IST2020-05-29T12:48:21+5:302020-05-29T13:00:20+5:30
ओडिशाच्या कटक जिल्ह्यात घडली खळबळजनक घटना

ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील पुजार्याने मंदिरात नरबळी दिला. पुजाऱ्याचा असा विश्वास आहे की, हा प्राणघातक कोरोना विषाणू नष्ट होईल. पुजाऱ्याने सांगितले की, देवाने स्वप्नात येऊन त्याला आज्ञा दिली की नरबळीमुळे कोरोनाचा नाश होईल.

कटक जिल्ह्यातील बंधुदा गावात बुधवारी रात्री एक भयानक घटना घडली. येथे एका ब्राह्मणी देवीच्या मंदिरात एका पुजार्याने नरबळी दिला. मंदिराच्या आवारातच एका व्यक्तीचा मृतदेह सापडला. सरोज कुमार प्रधान (वय 52) असे मृताचे नाव आहे.

स्थानिक पोलिसांनी हत्येसाठी वापरलेले हत्यार जप्त केले आणि आरोपी पुजारी संसार ओझा याची चौकशी केली असता पोलिसांना ही धक्कादायक बाब उघडकीस आली. कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी या माणसाची हत्या केल्याची कबुली पुजारीने दिली आहे.

पुजाऱ्याने सांगितले की, देवाने त्याच्या स्वप्नात असे काही करण्याचे आदेश दिले होते. आरोपी पुजारी संसार ओझा याला ताब्यात घेऊन पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला.

डीआयजी आशिष सिंह म्हणाले की, ही एक भयानक घटना आहे. आम्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविला आहे, तपास सुरू आहे.

















