काहींना टबमध्ये बुडवलं तर काहींना...; 'सायको काकी'ची थरकाप उडवणारी मोडस ऑपरेंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 18:44 IST2025-12-04T18:37:59+5:302025-12-04T18:44:20+5:30

सीरियल किलर पूनमने कबूल केलं की, तिची सर्वात मोठी समस्या सुंदर मुलं होती.

हरियाणातील पानिपत येथे पूनम नावाच्या महिलेने चार मुलांचा जीव घेतला. पोलीस चौकशीदरम्यान, सीरियल किलर पूनमने कबूल केलं की, तिची सर्वात मोठी समस्या सुंदर मुलं होती. तिला कोणीही तिच्यापेक्षा सुंदर दिसू नये असं वाटत होतं.

२०२३ मध्ये सोनीपतच्या बोहर गावात पूनमने नणंदेच्या लहान मुलीला बाथरूममध्ये नेलं आणि तिला बुडवलं. यानंतर तिने बाहेरून दार बंद केलं. कुटुंबाला वाटलं की हा अपघात आहे. कोणालाही कल्पना नव्हती की हत्या आहे.

पहिली हत्या केल्यानंतर तिला भीती वाटली की, कोणीतरी तिच्यावर संशय घेईल. हा संशय टाळण्यासाठी तिने एक भयानक कट रचला. तिने तिच्या तीन वर्षांच्या मुलाला शुभमलाही पाण्यात बुडवून मारलं.

२०२५ मध्ये आपल्या पालकांच्या घरी परतल्यावर पूनमची नजर पुन्हा एकदा एका निष्पाप मुलीवर पडली. ती निष्पाप मुलगी तिच्या भावाची १० वर्षांची मुलगी जिया होती. पूनमने तिला संपवण्याचा निर्धार केला.

मुलीला गोठ्यात घेऊन गेली आणि नंतर तिचं डोकं पाण्याच्या टाकीत बुडवलं. कुटुंबाला वाटलं की मुलगी पाय घसरून पडली आहे. १ डिसेंबर २०२५ रोजी पूनमने जावेची मुलगी विधीची हत्या केली.

विधीचं डोकं पाण्याने भरलेल्या टबमध्ये बुडवलं. मात्र यावेळी ही घटना अपघातासारखी वाटली नाही. घटनास्थळी पोलिसांना बोलावण्यात आलं. जवळील सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन करण्यात आले. त्यावेळी पूनम तिथे दिसली. बाथरूमजवळून येणारी आणि जाणारी ती एकटीच होती.

जेव्हा चौकशी सुरू झाली तेव्हा पूनमने धक्कादायक खुलासा केला. तिने ही मुलं सुंदर असल्याने त्यांचा जीव घेतल्याचं सांगितलं. पोलिसांनी याप्रकरणी पूनमला आता अटक केली आहे.

पूनमने आई, मामी, काकी, आत्या या प्रत्येक नात्याचाच खून केला आहे. तिला एक विचित्र वेड होतं की, कोणतीही मुलगी मोठी होऊन तिच्यापेक्षा सुंदर होऊ नये. या वेडामुळे ती एक सायको किलर बनली.

पोलीस चौकशीदरम्यान तिने सुंदर मुलींचा द्वेष केल्याचं कबूल केलं. तिने तिच्या नातेवाईकांच्या आणि कुटुंबातील मुलींना टार्गेट केलं. २०२३ मध्ये तिने इशिका आणि शुभम या दोन जणांची हत्या केली. शुभम हा तिचा स्वतःचा मुलगा होता.