Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 11:31 IST2025-09-17T11:25:16+5:302025-09-17T11:31:24+5:30

Nupur Bora : घरातून ९२ लाख रुपये रोख आणि सुमारे १ कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले.

आसाममध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेचा एक भाग म्हणून मुख्यमंत्र्यांच्या विशेष दक्षता कक्षाने आसाम सिव्हिल सर्व्हिसेस (ACS) अधिकारी नुपूर बोराच्या घरावर छापा टाकला.

पथकाने याच दरम्यान तब्बल ९२ लाख रोख रक्कम आणि १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.छापेमारीत कोट्यवधी रुपयांची बेकायदेशीर संपत्ती उघडकीस आली आहे.

कामरूप जिल्ह्यातील गोरैमारी येथे तैनात असलेली सर्कल ऑफिसर नुपूर बोराला अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांच्या पथकाने तिच्या घरावर केलेल्या छापेमारीनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

गुवाहाटी येथील तिच्या घरातून ९२ लाख रुपये रोख आणि सुमारे १ कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले. बारपेटा येथील तिच्या भाड्याच्या घरातही १० लाख रुपये रोख सापडले.

नुपूरने अवघ्या पाच वर्षांच्या सेवेत जमवलेल्या प्रचंड संपत्तीने सरकारपासून ते सामान्य जनतेपर्यंत सर्वच जण हैराण झाले आहेत. गोलाघाट जिल्ह्यातील रहिवासी नुपूर बोरा २०१९ मध्ये नागरी सेवेत रुजू झाली

एक मेहनती अधिकारी म्हणून पाहिलं जात असे. कुटुंबाला तिचा अभिमान वाटत होता. परंतु प्रशासकीय जीवनातील हा प्रवास अचानक भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर व्यवहारांकडे वळला.

गेल्या सहा महिन्यांपासून तिच्यावर नजर ठेवली जात होती. ती मोठ्या प्रमाणात पैसे स्वीकारत असल्याचा आरोप होता. शेवटी कारवाई करत नुपूरला अटक करण्यात आली.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी कारवाईची पुष्टी केली आणि स्पष्टपणे सांगितलं की, "बारपेटामध्ये सर्कल ऑफिसर म्हणून काम करताना नुपूर बोराने हिंदूंच्या मालकीची जमीन संशयास्पद व्यक्तींना हस्तांतरित केली आणि त्या बदल्यात मोठ्या प्रमाणात पैसे स्वीकारले."

"हे सहन केले जाणार नाही. महसूल विभागात, विशेषतः अल्पसंख्याकबहुल भागात भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहील." दक्षता विभागाने केवळ बोराविरुद्ध कारवाई केली नाही.

या पथकाने बारपेटा महसूल मंडळ कार्यालयातील कर्मचारी सुरजित डेकाच्या घरावरही छापा टाकला. बोरा आणि डेका यांनी संयुक्तपणे बारपेटा येथे अनेक जमीन खरेदी केली असल्याचा संशय तपासकर्त्यांना आहे. या मालमत्तांची आता चौकशी केली जात आहे.

छाप्यादरम्यान सापडलेली संपत्ती, सोनं आणि दागिन्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. अवघ्या पाच वर्षांच्या सेवेत नुपूरने इतकी संपत्ती कशी मिळवली याचा तपास आता केला जात आहे.