महिलेच्या मृत्यूप्रकरणी घाटकोपर येथे आंदोलन करणाऱ्या किरीट सोमय्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 20:14 IST2020-10-15T20:09:45+5:302020-10-15T20:14:00+5:30
Crime News : शितल दामा (३२) यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी तसेच त्यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या महानगरपालिकेच्या कंत्राटदार व अधिकार्यांवर गुन्हा नोंदविण्यात यावा. या मागणीसाठी किरीट सोमय्या यांनी गुरुवारी घाटकोपर पोलीस ठाण्याच्या समोर आंदोलन केले.

या आंदोलनात सोमय्या यांच्यासोबत शितल दामा यांचे कुटुंबीय देखील सहभागी झाले होते. दुपारच्या वेळेस घाटकोपर पोलीस ठाण्याच्या समोर सोमय्या बराच वेळ आंदोलन करत होते.
यावेळी महानगरपालिका व राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी देखील सुरू होती. पोलीस आपल्या आंदोलनाची दखल घेत नसल्याचे पाहून सोमय्या यांनी जवळच असलेला एलबीएस मार्ग रोखून धरण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी तेथे तातडीने दाखल होत सोमय्या यांना रस्ता अडविण्यापासून रोखले. यावेळी पोलीस आंदोलनकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यानंतर आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांनी सोमय्या यांना ताब्यात घेतले.
घाटकोपरच्या असल्फा गावात राहणाऱ्या शितल दामा या काही दिवसांपूर्वी बेपत्ता होत्या. मागील आठवड्यात त्यांचा मृतदेह हाजीअली जवळ आढळून आला. दमा या पीठ आणण्यासाठी घरातून बाहेर पडल्या होत्या. बराच उशीर होऊन देखील त्या घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबाने शोधाशोध सुरू केली. यावेळी त्यांच्या कुटुंबाला नाल्याच्या एका उघड्या झाकणा जवळ पिठासाठी नेलेली पिशवी आढळली होती.
त्यावेळेस मुसळधार पाऊस झाल्याने शीतल यांचा नाल्यात पडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र घाटकोपर येथील छोटय़ा नाल्यात पडल्यानंतर मानवी मृतदेह २२ किलोमीटर लांब हाजीअलीपर्यंत वाहून येऊच शकत नाही, असे निरीक्षण महापालिका अधिकाऱ्यांनी नोंदविले होते.
आंदोलनादरम्यान किरीट सोमय्या म्हणाले की, शितल यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळायला हवा. शितल यांच्या मृत्यूस महानगरपालिका जबाबदार आहे. मात्र राज्य सरकार महानगरपालिकेतील कंत्राटदार व अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी गुन्ह्याची नोंद करत नाही.