आरशामागे 'सीक्रेट' रुम, कोट्यवधी रोकड अन् भरपूर सोनं; IT अधिकारी पैसे मोजून थकले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 11:38 AM2023-10-06T11:38:43+5:302023-10-06T11:42:30+5:30

आयकर विभागाच्या टीममधील १५० अधिकाऱ्यांनी मयूर ग्रुपच्या अनेक राज्यात एकत्र धाड टाकली. त्यात कानपूर, मुंबई, सूरत, दिल्ली आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणांचा समावेश आहे. सूत्रांनुसार, आयकर विभागाने पहिल्या दिवशीच्या कारवाईत ३ कोटी रोकड आणि ३ कोटींचे सोने जप्त केले.

इतकेच नाही तर आयकर विभागाच्या टीमला मयूर ग्रुपचे मालक मनोज गुप्ता यांच्या कानपूर येथील एमरल्ड सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये सीक्रेट खोलीही सापडली. ज्यात सोने आणि रोकड मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आली आहे.

मयूर ग्रुप हे आयुर्वेदिक तेल, फूड आयटम्स, पॅकेजिंगचे काम करते. ज्यावेळी आयकर विभागाचे अधिकाऱ्यांनी मयूर ग्रुपच्या संपत्तीवर धाड टाकली तेव्हा प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. तेव्हा अधिकाऱ्यांना एका फ्लॅटमध्ये मोठा आरसा दिसला.

इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा हा आरसा हलवला तेव्हा तो स्लाईड मिरर असल्याचे दिसले. अधिकाऱ्यांनी आरसा बाजूला केला तेव्हा आतील दृश्य पाहून ते शॉक झाले. त्याठिकाणी एक सीक्रेट खोली होती. जिथे मोठ्या प्रमाणात रोकड आणि अन्य मौल्यवान वस्तूही ठेवण्यात आल्या होत्या.

सूत्रांनुसार, मयूर ग्रुपनं कंपनीवर २५ कोटींचे कर्ज असल्याचे दाखवले होते, परंतु प्रत्यक्ष तपासात ते केवळ कागदावर असल्याचे आढळले. मयूर ग्रुपने कोलकाता, मुंबई इतर ठिकाणी शेल कंपन्या स्थापन करून त्यावर कर्ज असल्याचे दाखवले.

त्याचसोबत मयूर ग्रुपने अनेक अशा कंपन्या बनावटरित्या खरेदी केल्याचे दाखवले. ज्या कंपन्यात अस्तित्वातच नाही. या कंपनीवर काळा पैसा रिअल इस्टेटच्या माध्यमातून पांढरा करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सध्या या प्रकाराची चौकशी सुरू आहे.

मयूर ग्रुपच्या विविध ठिकाणांवर मारलेल्या धाडीत २४ पेक्षा अधिक कंपन्या असल्याचे पुढे आले. त्यातील ३ प्रमुख कंपन्यांसह अन्य कंपन्यांची चौकशी सुरू आहे. या ग्रुपचा उद्योग देशातील ५ राज्यांमध्ये पसरला असल्याने एकाच वेळी धाड टाकण्यात आली.

मयूर ग्रुपच्या विलामध्ये कुटुंबातील २५-३० लोक एकत्रित राहतात. मनोज गुप्ता, सुरेश गुप्ता, सुनील गुप्तासह ५ भाऊ आणि त्यांची मुले व्यवसाय सांभाळतात. विशेष म्हणजे या ग्रुपने ग्लोबल इंवेस्टर्स समिटमध्ये फूड प्रोसेसिंग क्षेत्रात २८५ कोटींच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव दिला होता.

आयकर विभागाच्या टीमने तपासावेळी संबंधित कंपन्यांचे महत्त्वाचे दस्तावेज जप्त केले. ही कागदपत्रे ४ वर्ष जुनी आहेत. मयूर ग्रुपच्या व्यवसायात बांगलादेशाच्या मार्गे थायलँडहून वनस्पती तेलाचा कच्चा माल मागवला जायचा हे समोर आले.

गुरुवारी सकाळी ६ वाजता आयकर विभागाचे अधिकारी मयूर ग्रुपच्या ठिकाणांवर पोहचले. या कंपनीवर १ हजार कोटींच्या टॅक्स चोरीचा आरोप आहे. याआधीही कंपनीच्या ठिकाणांवर ३० डिसेंबर २०२१ मध्ये धाड टाकली होती.