तोंडात अ‍ॅसिड घातले अन् अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळले; हुंड्यासाठी नवविवाहितेचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 05:37 AM2021-07-28T05:37:09+5:302021-07-28T05:43:00+5:30

उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमध्ये एक ह्दयद्रावक घटना घडली आहे. याठिकाणी नुकतेच लग्न झालेली मुलगी हुंड्यासाठी बळी गेली आहे.

उत्तर प्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यात हुंड्यासाठी एका नवविवाहितेला जिवंत जाळण्यात आल्याचा आरोप तिच्या सासरच्या मंडळीवर लावण्यात आला आहे. या घटनेनंतर पीडित कुटुंबानं पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र पोलिसांच्या कारवाईवर ते नाराज आहेत.

सध्या आरोपी पतीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात येत आहेत. हुंड्यासाठी हत्या करण्याची ही घटना सुल्नानपूर घोष पोलीस ठाणे हद्दीतील अफोई गावात घडली. ४ लाख रुपये हुंडा न दिल्यानं सासरच्या लोकांनी सूनेची निर्घृण हत्या केली आहे.

नवविवाहित तरूणीच्या तोंडात बळजबरीनं अ‍ॅसिड घातले त्यानंतर तिच्यावर रॉकेल ओतून जिवंत जाळले. मृत महिलेचा भाऊ मोहम्मद यासीनने सांगितले की, या घटनेची माहिती आम्ही पोलिसांना दिली मात्र त्यांनी आमचं काही ऐकलं नाही. खूप प्रयत्न केल्यानंतर रात्री उशीरा गुन्हा नोंद केला. परंतु कारवाई करण्यात आली नाही.

या घटनेबाबत एसपी राजेश कुमार यांनी सांगितले की, कौशांबी जिल्ह्यातील मोहम्मद यासीन यांनी केलेल्या तक्रारीत म्हटलंय की, त्याची बहीण माहेनूर हिचं लग्न मे २०२१ मध्ये फतेहपूर जिल्ह्यातील अफोई गावात राहणाऱ्या रुखसार अहमदसोबत झालं होतं.

लग्नाच्या काही दिवसानंतरच सासरच्यांनी हुंड्यांसाठी माझ्या बहिणीवर दबाव आणला. जेव्हा हुंड्याची रक्कम मिळाली नाही तेव्हा माझ्या बहिणीला जिवंत जाळलं असा आरोप केला आहे.

या घटनेबाबत मॅजिस्ट्रेटद्वारे पंचनामा केल्यानंतर मृतदेहाचा पोस्टमोर्टम करण्यात आला. महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह ४ लोकांविरोधात आयपीसी कलम ४९८ ए, ३०४ बी हुंडा प्रतिबंध अधिनियम १९६१ च्या कलम ३,४ नुसार गुन्हा नोंदवला आहे.

सध्या पोलीस ताब्यात असलेल्या पतीची चौकशी करत आहेत. या प्रकरणी आम्ही निष्पक्ष चौकशी करत असून घटनेतील दोषींना कडक शिक्षा केली जाईल असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.