विमान हवेत असतानाच दरोडा अन् हवेतच फरार झाला चोर! FBI साठी 'ती' केस आजही न उलगडलेलं कोडं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 08:20 AM2022-11-25T08:20:06+5:302022-11-25T08:27:40+5:30

तारीख होती २४ नोव्हेंबर १९७१...दुपारची वेळ आणि अमेरिकेचे ओरेगॉन राज्य. एक सामान्य दिसणारा व्यक्ती पोर्टलँडमधील नॉर्थवेस्ट ओरिएंट एअरलाइन्सच्या काउंटरवर गेला. त्यानं आपलं नाव डॅन कूपर असं सांगितलं. त्यानं कॅश वापरून सिएटल, वॉशिंग्टनसाठी फ्लाइट ३०५ चे सिंगल तिकीट काढलं.

इथूनच सुरू झाला अमेरिकन तपास संस्था 'एफबीआय'च्या इतिहासातील सर्वात मोठ्या न उलगडलेल्या रहस्याची कहाणी. डॅन कूपर हा साधारण ४०-४५ वर्षांचा होता. त्यानं काळी टाय आणि पांढरा शर्ट असा बिझनेस सूट परिधान केला होता.

फ्लाइट टेक ऑफ होण्याची वाट पाहात होतं. कूपरनं एक ड्रींक, एक बोर्बन व्हिस्की आणि सोडा ऑर्डर केला. दुपारी ३ नंतर कूपरनं एअर होस्टेसला स्लिप दिली. त्याच्या ब्रीफकेसमध्ये बॉम्ब होता आणि एअर होस्टेसनं त्याच्यासोबत बसावं असं त्या स्लिपवर लिहिलं होतं. घाबरलेल्या महिलेनं कूपरनं सांगितल्याप्रमाणं कृती केली. कूपरनं त्याची ब्रीफकेस उघडली आणि तिला दाखवली. त्यात अनेक तारा आणि लाल रंगाच्या नळकांड्या होत्या, ते पाहून एअर होस्टेसला धक्काच बसला. आपण काय म्हणतोय ते लिहून घ्यायला कूपरनं महिलेला सांगितलं.

काही वेळानं एअर होस्टेस चार पॅराशूट आणि 200,000 डॉलर्सची मागणी करणारी एक चिठ्ठी घेऊन फ्लाइटच्या कॅप्टनकडे गेली. जेव्हा विमान सिएटलमध्ये उतरलं तेव्हा कूपरनं पैसे आणि पॅराशूटच्या बदल्यात ३६ प्रवाशांना सोडलं. पण त्याने क्रू मेंबर्सपैकी अनेकांना कैद करून ठेवलं.

विमानानं पुन्हा उड्डाण केलं आणि कूपरनं कॅप्टनला मेक्सिको सिटीकडे जाण्याचा आदेश दिला. पण मध्येच काहीतरी वेगळंच घडलं, कारण तसं जर घडलं नसतं तर २४ नोव्हेंबरला 'डीबी कूपर डे' साजरा झाला नसता.

सिएटल आणि रेनोच्या मध्यावर असताना रात्री ८ वाजता कूपरनं पॅराशूट आणि पैशासह विमानाच्या मागच्या बाजूनं उडी मारली. वैमानिकांनी सुरक्षित लँडिंग केलं पण रात्रीच्या अंधारात कूपर कुठे गायब झाला हे आजही गूढ आहे. या घटनेची माहिती मिळताच एफबीआयनं तातडीनं तपास सुरू केला.

अनेक वर्षे सुरू असलेल्या नॉर्थवेस्ट हायजॅकिंगमुळे त्याचं नाव नॉरजॅक ठेवण्यात आलं. शेकडो लोकांची चौकशी करण्यात आली, देशभरात वेगवेगळ्या प्रकरणाची माहिती घेण्यात आली. पुराव्यांसाठी विमानाचीही तपासणी करण्यात आली.

तपासानंतर पाच वर्षांपर्यंत संशयितांच्या यादीत ८०० हून अधिक नावं समाविष्ट झाली होती. कूपर विमानातून खाली उडी मारून वाचू शकला नाही, असा एक अंदाज लावण्यात आला. त्यानं वापरलेलं पॅराशूट उघडलं गेलं नाही आणि रात्रीच्या अंधारात त्यानं जंगलात उडी मारली. या दाव्याला १९८० च्या दशकात आणखी समर्थन मिळालं जेव्हा एका मुलाला नोटांनी भरलेली एक कुजलेली बॅग सापडली.

बॅगेतील नोटांवरील क्रमांक कूपरला दिलेल्या नोटांच्या अनुक्रमांकांशी जुळतात. पण अचानक दिसलेला, विमान हायजॅक करून गूढपणे गायब झालेला माणूस आजही एफबीआय अधिकाऱ्यांसाठी एक रहस्यच बनून राहिलेला आहे.