‘या’ पाकिस्तानी गुंतवणूकदारासोबत बॉलिवूड कलाकारांचे कनेक्शन; दहशतवाद्यांना फंडिंग करण्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 01:11 PM2020-07-31T13:11:58+5:302020-07-31T13:16:46+5:30

भारतीय गुप्तचर एजेंसी रॉचे माजी अधिकारी एन के सूद यांनी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचे ब्रिटनमध्ये राहणाऱ्या पाकिस्तानी गुंतवणूकदार एनील मुसर्रत याच्याशी संबंध असल्याचा आरोप केला आहे.

सूद यांनी यू-ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून हा आरोप केला आहे, यात पाकिस्तानच्या गुंतवणूकदाराचे आणि बॉलिवूडमधील कलाकारांच्या संबंधाबाबत त्यांनी व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओत दिपिका पादुकोण, अनिल कपूर कुटुंब आणि करण जोहरवर निशाणा साधला आहे.

त्याचसोबतच अभिनेत्री दिपिका पादुकोणला जेएनयूत विरोध प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानातील रिअल इस्टेट आणि दहशतवाद्यांना फंडिंग करणाऱ्या एनील मुसर्रत याने सांगितले होते, एनीलने सीएए विरोधातील आंदोलनात पैसे पुरवण्याची महत्त्वाची भूमिका निभावली असा दावा केला आहे.

ज्यावेळी दिपिका पादुकोण जेएनयूच्या विरोध प्रदर्शनात सहभागी झाली तेव्हा पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी जनरल आसिफ गफूर यांनी ट्विट करुन तिची प्रशंसा केली. त्याचबरोबर सीएएविरोधात पोस्ट करण्यासाठी सोनम कपूरला एनीलने सांगितल्याचा दावा केला. ब्रिटीश अधिकाऱ्यांनी मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी कारवायांसाठी अनेकदा त्याची चौकशी केली आहे.

एनील मुसर्रत हा ब्रिटनच्या मैनचेस्टरमध्ये राहणारा पाकिस्तानी नागरिक आहे. त्याचा मुख्य व्यवसाय रिअल इस्टेटचा आहे. त्याचे पाकिस्तानी पंतप्रधान इमरान खान यांच्याशी जवळचे संबंध आहेत.

एनील मुसर्रतने पाकिस्तानी निवडणुकीच्या राजकीय कॅम्पेनसाठी पैसा लावला होता. इतकचं नाही तर पाकिस्तानात ५ मिलियनपेक्षा जास्त घरांच्या योजनेसाठी तो पाकिस्तान सरकारची मदत करत आहे.

एनके सूद यांनी असा दावा केला आहे की, एनील हा दहशतवादी संघटनांना फंडिंग करण्याचंही काम करतो, भारतात होणाऱ्या दहशतवादी कारवायांसाठी हवालाच्या माध्यमातून पैसे पोहचवण्यासाठी एनीलचा हात असतो. अलीकडे भारतात झालेल्या सीएएविरोधातील आंदोलनातही एनीलने फंडिंग केलं आहे असा आरोप त्यांनी केला.

एनील मुसर्रत याचे बॉलिवूडमधील अनेक कलाकारांशी घनिष्ट आणि कौटुंबिक संबंध आहेत. मे २०१८ मध्ये सोनम कपूर हिच्या लग्नात तो दिसून आला होता. अनिल कपूर यांची पत्नी सुनीता कपूर यांच्यासोबत त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. या लग्नात बॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते.

चित्रपट व्यवसायात गुंतवणूक करण्याचं काम एनील मुसर्रत करतो. हे बेकायदेशीर नाही पण हा पैसे भारताविरोधी ताकदीकडून घेणे हा गुन्हा आहे असं एनके सूद म्हणाले.

नोव्हेंबर २०१८ मध्ये एनीलची एकूण संपत्ती ३०० मिलियन पाऊंड होती, सप्टेंबर २०१७ मध्ये एनील मुसर्रतच्या मुलीचं लग्न मैनचेस्टरमध्ये झालं. या लग्नाला इमरान खान आणि अन्य पाकिस्तानी अधिकारी हजर होते, तसेच या लग्नात अनिल कपूर, करण जोहर, सोनम कपूर, ऋतिक रोशन, सुनील शेट्टी सहभागी होते.

काही कागदपत्रांनुसार सूद यांनी व्हिडीओत दावा केला आहे की, एनील मुसर्रत हवालाच्या माध्यमातून व्यवहार करतो, एनीलची चौकशी केली तर अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. एनील भारतात आला तर त्याला अटक करण्यात यावी आणि भारताविरोधी कारवायांमध्ये त्याची भूमिका काय याचा खुलासा व्हावा अशी आग्रही मागणी एनके सूद यांनी केली.