“तुझ्या पत्नीला जेलमध्ये पाठवू अन् मुलांची हत्या करू”; सुसाईड नोट लिहून बिल्डरची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 10:52 AM2021-10-20T10:52:21+5:302021-10-20T10:56:35+5:30

उत्तर प्रदेशच्या गाजियाबाद जिल्ह्यातील साहिबाबादमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून बिल्डर धर्मेंद कुमारनं मंगळवारी दुपारी पंख्याला लटकून जीव दिला आहे. मृत्यूपूर्वी धर्मेंद्रनं ७ पानी सुसाईड नोट लिहून व्याजदरांच्या धमकीचा उल्लेख केला आहे.

तुझ्या पत्नीला खोट्या गुन्ह्यात अडकवू, मुलांची हत्या करू अशा धमक्या बिल्डरला देण्यात येत होत्या. सावकाराकडून त्याने ३ लाख कर्ज घेतले होते. त्यावर १० टक्क्यांनी व्याज घेतले जात होते. बिल्डर धर्मेंद्र कुमार कर्ज फेडण्यास विलंब करत असल्याने त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला.

मूळचे मेरठचे असलेले धर्मेंद्र कुमार २ वर्षापासून पत्नी मोनिका आणि मुलगा लक्कीसह डीएलएफ कॉलनीच्या ३ मजल्याच्या बंगल्यात राहतात. वरील २ मजले भाड्याने देण्यात आले होते. धर्मेंद्रचा मोठा मुलगा फरिदाबाद येथे शिक्षणासाठी गेला होता. मागील काही दिवसांपासून धर्मेंद्र तणावाखाली जगत होते.

जेव्हा ही घटना घडली तेव्हा कुटुंबीतील कुणीही सदस्य उपस्थित नव्हतं. शेजाऱ्यांनी धर्मेंद्र यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचं पाहताच त्याची सूचना त्यांचा भाऊ दीपक यांना दिली. त्यानंतर राजनगर एक्सटेंशन येथून दीपक घटनास्थळी पोहचला तेव्हा दरवाजा उघडताच धर्मेंद्र पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला.

त्यानंतर दीपकनं ही माहिती वहिनी मोनिका आणि कुटुंबातील इतर सदस्यांना दिली. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. पोस्टमोर्टमनंतर पोलिसांनी धर्मेंद्रचा मृतदेह कुटुंबाच्या स्वाधीन केला. कुटुंब आणि नातेवाईकांनी धर्मेंद्रच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

धर्मेंद्रच्या मृत्यूनंतर पत्नी मोनिका आणि कुटुंबातील इतर सदस्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याचवेळी धर्मेंद्रच्या लहान मुलाची तब्येत बिघडल्याने त्याला आत्याकडे पाठवण्यात आले. पत्नी मोनिका यांनी पती धर्मेंद्रला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

पोलिसांनी घेतलेल्या जबाबानुसार पत्नी मोनिका आणि भाऊ दीपक यांनी सांगितले की, धर्मेंद्र कुमार यांनी २ वर्षापूर्वी लोनीच्या रिस्तल गावातील रहिवासी नरेश आणि प्रविण यांच्याकडून काही कामानिमित्त ३ लाख रुपये कर्ज १० टक्के व्याजाने घेतले होते.

१० टक्के व्याज आकारुनही धर्मेंदवर दबाव टाकण्यात येत होता. नरेश आणि प्रविण या दोघांमुळे पतीने आत्महत्या केल्याचं पत्नी मोनिकाचा आरोप आहे. धर्मेंद्र यांनी सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली. मोनिका छोट्या मुलाला घेऊन माहेरी गेली असताना ही घटना घडली.

बिल्डर धर्मेंद कुमारनं सुसाईड नोटमध्ये लिहिलंय की, मी धर्मेंद्र कुमार स्वत:चं आयुष्य संपवत आहे. मला न्याय मिळेल हीच अपेक्षा प्रशासनाकडून आहे. मी नरेश आणि प्रविणकडून कर्ज घेतलं होते. ते दोघं माझी फसवणूक करून माझा फ्लॅट हडपण्याचा प्रयत्न करत होते. मी माझं सोनं विकून पैसे दिले तरी त्यांचे पोट भरले नाही.

ते मला वारंवार ब्लॅकमेल करत होते. माझ्या पत्नीला आणि मला मारून टाकू. त्यांच्याकडे बेकायदेशीर शस्त्रंही होती. तुझ्या पत्नीला जेलमध्ये पाठवू आणि मुलांची हत्या करू अशा धमकी दिली जात होती. माझं कुटुंबावर खूप प्रेम आहे. कदाचित माझ्या या निर्णयानं ते दुखावतील. मला माफ करा. प्लीज माझ्या कुटुंबाला आणि मित्रांना त्रास देऊ नका असं सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं.