घरात लाऊडस्पीकर वाजवत असाल तर खबरदार; ‘हे’ नियम वाचा अन्यथा जेलमध्ये जाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 02:46 PM2022-05-05T14:46:46+5:302022-05-05T14:50:56+5:30

Raj Thackeray: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटवावे अशी मागणी करत सरकारला इशारा दिला. त्यानंतर देशभरात लाऊडस्पीकरचा मुद्दा चर्चेत आला.

सध्या देशभरात लाऊडस्पीकरचा वाद उफाळून आला आहे. महाराष्ट्रापासून यूपीपर्यंत, राजस्थानपासून मध्य प्रदेशपर्यंत भोंग्यावरून राजकारण सुरू आहे. महाराष्ट्रात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भोंग्यावरून राज्य सरकारला अल्टीमेटम दिला होता.

उत्तर प्रदेशात आतापर्यंत ५० हजाराहून अधिक अनधिकृत भोंगे उतरवण्यात आले. ६० हजाराहून अधिक लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्यात आला. मुंबईतही अनेक ठिकाणी भोंग्याविना अजान दिली जात आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करत अनेकांनी भोंग्याचा आवाज कमी केला आहे.

लाऊडस्पीकरचा वाद हा काही नवीन नाही. काही वर्षापूर्वी गायक सोनू निगमनेही मस्जिदीवरील अजान भोंग्यावरून दिली जात असल्याचा आक्षेप घेतला होता. सकाळी सकाळी जोरात सुरू होणाऱ्या भोंग्यावरून झोप लागत नाही अशी पोस्ट त्यांनी केली होती.

देशभरात लाऊडस्पीकरच्या वापराला बंदी नाही. परंतु त्याचा वापराबाबत काही अटी-शर्थी ठेवल्या आहेत. जेणेकरून लाऊडस्पीकरच्या वापरामुळे दुसऱ्याच्या आयुष्यावर परिणाम होऊ नये. लाऊडस्पीकरच्या वापराबाबत कायद्यात २ हजार तरतुदी आहेत.

नियमानुसार, कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर अथवा कुठलेही वाद्य वाजवायचे असेल तर त्यासाठी परवानगी घ्यावी लागते. इतकेच नाही तर जर तुम्ही रहिवासी भागात राहात असाल तर त्यासाठीही वेगळे नियम आखण्यात आले आहेत.

हे नियम समजून घेण्यासाठी प्रथम लाऊडस्पीकर किंवा कोणतेही वाद्य किती वेळ वाजवण्यास परवानगी आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. नियमांनुसार, लाऊडस्पीकर किंवा वाद्य वाजवण्याची परवानगी फक्त सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत आहे. सार्वजनिक ठिकाणी वापरत असाल तर प्रशासनाची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे.

मात्र, राज्य सरकारची इच्छा असल्यास ते काही प्रसंगी सवलत देऊ शकते. कोणत्याही संस्था किंवा धार्मिक कार्यक्रमासाठी लाऊडस्पीकर किंवा इतर वाद्ये वाजवण्याची परवानगी सरकार रात्री १० ते १२ पर्यंत वाढवू शकते. मात्र, अशी परवानगी वर्षातून केवळ १५ वेळाच दिली जाऊ शकते.

ध्वनी प्रदूषण नियमांनुसार, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) चार वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी ध्वनी निकष निश्चित केले आहेत. त्यानुसार औद्योगिक, व्यावसायिक, निवासी आणि सायलेन्स झोनमध्ये किती आवाज असेल याचा निकष निश्चित करण्यात आला आहे.

नियमांनुसार सायलेन्स झोनमध्ये लाऊडस्पीकर किंवा कोणताही लाऊडस्पीकर वाजवण्यास प्रतिबंध नाही. सायलेन्स झोनमध्ये रुग्णालये, शाळा आणि न्यायालये यासारख्या ठिकाणांचा समावेश होतो. मात्र, परवानगी आणि अटींसह वाजवता येईल.

समजा तुमचे स्वतःचे घर आहे आणि तुम्हाला तुमच्या घरात काहीही करण्याचा अधिकार आहे. पण याचा अर्थ असा नाही की, तुमच्या घरातील लाऊडस्पीकर किंवा कोणत्याही वाद्याच्या आवाजाची पातळी दिवसा ५५ डेसिबल आणि रात्री ४५ डेसिबलपेक्षा जास्त असावी.

असे झाल्यास, नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल तुम्हाला तुरुंगवास आणि एक लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. १९९२ मध्ये, पीए जेकब विरुद्ध कोट्टायम एसपी या प्रकरणात, केरळ उच्च न्यायालयाने निर्णय दिला की कलम १९(१) अंतर्गत हमी दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोणत्याही व्यक्तीला मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी देत नाही.