65 वर्षांची महिला, 14 महिन्यांत 8 मुलींना जन्म दिला; घोटाळेबाज बिहारमध्ये झाले शक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 09:36 AM2020-08-22T09:36:48+5:302020-08-22T09:41:05+5:30

नॅशनल हेल्थ मिशन म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये मिळणारा पैसा हडपण्यासाठी दलालांनी हा घोटाळा केला आहे. या योजनेंतर्गत मुलीच्या जन्मानंतर पालकांना ठराविक रक्कम दिली जाते.

बिहारचे घोटाळ्यांशी जुनेच नाते आहे. आता एका सरकारी योजनेमध्ये घोटाळा उघड झाला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा घोटाळा करताना लोक निसर्गाचा नियमही विसरले. एका 65 वर्षीय महिलेला या वयात अपत्ये झाल्याचे दाखविले. ते देखील 14 महिन्यांत 8 वेळा.

विज्ञानानुसार ही गोष्ट अशक्य आहे मात्र, राष्ट्रीय आरोग्य मोहिमेमध्ये हे शक्य झाले आहे. मुलगी झाल्यानंतर मिळणारा प्रोत्साहन भत्ता हडप करण्यासाठी हे उद्योग केल्याचे समोर आले आहे.

एनबीटीने याबाबतचे वृत्त दिले आहे. हे प्रकरण बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्हायातील मुशहरी भागातील आहे. नॅशनल हेल्थ मिशन म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये मिळणारा पैसा हडपण्यासाठी दलालांनी हा घोटाळा केला आहे. या योजनेंतर्गत मुलीच्या जन्मानंतर पालकांना ठराविक रक्कम दिली जाते.

या घोटाळ्यात दलालांनी कागदावर मुलींची खोटी नावे टाकली व ही प्रोत्साहन रक्कम हडप केली आहे. यामध्ये अनेक अशा महिला आहेत ज्या नैसर्गिक रित्या आई बनू शकत नाहीत. मात्र, त्यांनीच मुलींना जन्माला घातल्याचे यामध्ये दाखविण्यात आले आहे.

65 वर्षांच्या एका महिलेने 14 महिन्यांतच 8 मुलींना जन्म दिल्याचे दाखविण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे या योजनेचे अधिकारी आणि बँकेचे सीएसपी या बनावट कागदपत्रांच्या आधारे या महिलेला पैसे पाठवत राहिले. हा प्रकार उघड होताच, मसुहरीचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी उपेंद्र चौधरी यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

65 वर्षांच्या लीलादेवी यांनी 14 महिन्यांत 8 मुलींना जन्म दिला आहे. प्रत्येक मुलीसाठी त्यांना 1400 रुपये सांगितलेल्या खात्यांवर पाठविण्यात आले आहेत. एवढेच नाही तर ते पैसे काढण्यातही आले आहेत.

याच प्रकारे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनमध्ये शांतीदेवी यांनी 9 महिन्यात 5 मुलींना जन्म दिला आहे. सोनियादेवी यांनी पाच महिन्यात 4 मुलींना जन्म दिला आहे.

याबाबत या महिलांकडे चौकशी करताच त्यांनाही धक्का बसला. हा प्रकार चुकीचा असून आमाहाला मुले होऊन अनेक वर्षे झाल्याचे त्या म्हणाल्या.

जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदोशावर या प्रकरणी उच्च स्तरीय चौकशी सुरु झाली आहे. एडीएम राजेश कुमार यांच्या चौकशी समितीला यामध्ये घोटाळ्याचे आरोप योग्य असल्याचे दिसले आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु असून जो कोणी दोषी असेल त्याच्या विरोधात विभागिय कारवाई केली जाणार असून शिक्षाही मिळणार असल्याचे जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी सांगितले.