तरुणांनो, असेही व्हा मालामाल! शेअर्समधील दीर्घकालीन गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 12:43 PM2022-06-06T12:43:53+5:302022-06-06T13:15:05+5:30

Share Market : पुष्कर कुलकर्णी : चांगल्या कंपनीच्या शेअर्समधील दीर्घकालीन गुंतवणूक आपल्याला नेहमीच मालामाल करीत असते.

शेअर बाजारात बोनस शेअर्स मिळून आणि शेअर स्प्लिटद्वारे दीर्घकालीन गुंतवणूकदार मालामाल होत असतात. विशेषतः तरुणांनी याकडे संपत्ती बनविण्याचा एक पर्याय म्हणून आवर्जून पाहावे.

जेव्हा कंपनीची उलाढाल वाढते आणि कंपनी नफ्यात असते तेव्हा शेअरधारकांस असा नफा बोनस शेअरच्या रूपात दिला जातो. बोर्ड बैठकीत शेअरधारकांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतला जातो. बोनस शेअर्स म्हणजे आपल्याकडे असलेल्या शेअर्सवर फ्रीमध्ये (मोफत) अतिरिक्त शेअर्स मिळणे.

शेअरची फेस व्हॅल्यू कमी करून त्या प्रमाणात शेअर्सचे विभाजन केले जाते त्यास शेअर स्प्लिट असे म्हणतात.उदाहरणार्थ मूळ फेस व्हॅल्यू १०/- रुपयेचा एक शेअर १:५ या प्रमाणात स्प्लिट केला गेला तर स्प्लिट केल्यानंतर त्याची फेस व्हॅल्यू रुपये २/- होते. ज्यांच्याकडे एक शेअर होता त्यांना ४ अतिरिक्त शेअर्स दिले जातात आणि त्यामुळे एका शेअरचे ५ शेअर्स होतात.

१:१ एका शेअरला एक शेअर बोनस शेअर; २:१ प्रत्येक एक शेअरला दोन बोनस शेअर; १:२ प्रत्येक दोन शेअरला एक शेअर बोनस.

बोनस आणि स्प्लिटमुळे आपल्या खात्यातील शेअर्सची संख्या वाढते आणि शेअरचा भाव त्यानुसार ॲड्जस्ट होऊन कमी होतो. जे गुंतवणूकदार दीर्घकालीन असतात त्यांना बोनस शेअर आणि स्प्लिट हे नेहमीच फायद्याचे ठरते.

कारण बोनस दिल्यानंतर खाली आलेल्या भावात पुन्हा खरेदी आणि विक्रीची उलाढाल होत असते आणि जर कंपनीचा व्यवसाय उत्तम चालला तर शेअरला मागणी वाढून भाव वधारतच जातो. यामुळे दीर्घकालीन शेअर गुंतवणूदारास यातून फायदाच होत असतो.

अनेक नामवंत कंपन्यांनी गेल्या वीस पंचवीस वर्षांत अनेकदा बोनस शेअर्स दिले आहेत आणि शेअर स्प्लिटही केले आहेत. याच काळात शेअर्सचे भावही वाढले आहेत. यामुळे चांगल्या कंपनीच्या शेअर्समधील दीर्घकालीन गुंतवणूक आपल्याला नेहमीच मालामाल करीत असते.