तुम्हीही पाहू शकता उद्योगपती मुकेश अंबानींचे घर! आलिशान राजवाड्यातील प्रत्येक गोष्ट पाहता येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 17:04 IST2025-05-18T16:58:06+5:302025-05-18T17:04:11+5:30
dhirubhai ambani memorial house : आता तुम्ही उद्योगपती मुकेश अंबानी यांचं अलिशान घराची सफर करू शकता. जिथे कधीकाळी मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाचा निवास होता, ते आता सामान्य लोकांसाठी उघडं करण्यात आलं आहे.

गुजरातमधील चोरवाड येथे असलेले धीरूभाई अंबानी मेमोरियल हाऊस आता लोकांसाठी खुले करण्यात आले आहे. याच घरात मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांनी त्यांचे बालपण घालवले होते. सुमारे १०० वर्षे जुन्या या घराची किंमत जवळपास १०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.
पूर्वी अंबानी कुटुंबाचे खासगी निवासस्थान असलेले हे घर आता एका सुंदर संग्रहालयात रूपांतरित झाले आहे. दोन मजली असलेले हे घर पारंपरिक गुजराती शैलीत बांधलेले आहे. या घराचा प्रत्येक कोपरा अंबानी कुटुंबाच्या संघर्षाची आणि यशाची कहाणी सांगतो.
घरात लाकडी कोरीवकाम केलेल्या खिडक्या, मोठे अंगण आणि एक सुंदर बाग आहे. हे घर धीरूभाई अंबानी यांचे वडील हिराचंद गोरधनभाई अंबानी यांचे होते आणि याच ठिकाणाहून अंबानी कुटुंबाच्या यशस्वी प्रवासाला सुरुवात झाली.
२०११ मध्ये या घराचे सार्वजनिक संग्रहालयात रूपांतरण करण्यात आले. येथे धीरूभाई अंबानी यांचे दुर्मिळ फोटो, त्यांच्या वापरलेल्या वस्तू आणि त्यांना मिळालेले पुरस्कार ठेवण्यात आले आहेत. अमिताभ टियोटिया डिझाईन्सच्या मदतीने या घराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. नूतनीकरणानंतरही घराची मूळ रचना आणि जुने फर्निचर जपण्यात आले आहे, तसेच सौर दिवे आणि सागवान लाकडाचा वापर केला आहे.
जर तुम्हाला हे ऐतिहासिक घर बघायचे असेल, तर तुम्ही मंगळवार ते रविवार सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेत चोरवाडला भेट देऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त २ रुपयांचे तिकीट काढावे लागेल. येथे तुम्हाला अंबानी कुटुंबाच्या प्रेरणादायी जीवनाची कहाणी जाणून घेता येईल आणि त्यांच्या जीवनावर आधारित पुस्तकेही खरेदी करता येतील.