जगातील सर्वात 'बलाढ्य' विरुद्ध सर्वात 'कमकुवत' चलन; यांच्यासमोर अमेरिकी डॉलरही फिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 11:36 IST2026-01-08T11:25:48+5:302026-01-08T11:36:57+5:30
World's Strongest Currency : जागतिक अर्थव्यवस्थेत चलनाची किंमत त्या देशाच्या आर्थिक ताकदीचे दर्शन घडवते. तुम्हाला जर जगातील सर्वात मजबूत चलन विचारले तर तुमच्यासमोर डॉलर येईल. पण, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे.

कुवेती दीनार हे सातत्याने जगातील सर्वात मौल्यवान चलन ठरले आहे. कुवेतचे अफाट तेल साठे आणि तेथील स्थिर आर्थिक धोरणे यामुळे या चलनाची ताकद टिकून आहे.

जेथे जगातील बहुतांश चलनांची किंमत डॉलरपेक्षा कमी असते, तिथे १ कुवेती दीनारची किंमत तब्बल ३.२६ अमेरिकन डॉलर इतकी आहे. यावरून कुवेतच्या आर्थिक सुबत्तेचा अंदाज येतो.

जर तुम्हाला कुवेतचा एक दीनार हवा असेल, तर आजच्या दरानुसार तुम्हाला सुमारे २९२.७९ भारतीय रुपये मोजावे लागतील. हे मूल्य जगातील इतर कोणत्याही चलनापेक्षा कितीतरी जास्त आहे.

दुसरीकडे, इराणी रियाल हे जगातील सर्वात कमकुवत चलन मानले जाते. आज १ भारतीय रुपयाच्या बदल्यात तब्बल ११,०४९ इराणी रियाल मिळतात.

१ अमेरिकन डॉलरची किंमत सध्या सुमारे ९.९४ लाख इराणी रियाल इतकी आहे. काही दिवसांपूर्वी तर हा दर १४.७ लाख रियालपर्यंत पोहोचला होता, जे या चलनाचे आतापर्यंतचे सर्वात नीचांकी मूल्य आहे.

जर आपण जगातील सर्वात मजबूत आणि सर्वात कमकुवत चलनाची थेट तुलना केली, तर १ कुवेती दीनारच्या बदल्यात तब्बल ३२,३६,२४६ इराणी रियाल मिळतात. दोन चलनांमधील ही तफावत थक्क करणारी आहे.

इराणी रियालच्या घसरणीमागे मुख्यत्वे अमेरिका-इराण यांच्यातील अणुकरार मोडणे हे कारण आहे. त्यानंतर इराणवर लादण्यात आलेले कडक आर्थिक निर्बंध आणि सध्या मध्य-पूर्वेत वाढलेला तणाव यामुळे रियालवर दबाव वाढत गेला आहे.

चलनाच्या मूल्यात सतत होणाऱ्या घसरणीमुळे इराणमध्ये महागाई प्रचंड वाढली आहे. डिसेंबर महिन्यापासून झालेल्या तीव्र उतार-चढावांमुळे तेहरान आणि इतर शहरांमध्ये नागरिकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे.

















