ज्या कंपनीत केलं कर्मचारी म्हणून काम, त्याच कंपनीच्या बनल्या को-फाऊंडर, कोण आहेत आकृती चोप्रा?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 08:45 AM2024-03-05T08:45:20+5:302024-03-05T08:53:56+5:30

२०११ मध्ये त्या झोमॅटोमध्ये कर्मचारी म्हणून रुजू झाल्या. परंतु अवघ्या १० वर्षातच आकृती या कंपनीच्या सह-संस्थापक बनल्या.

आकृती चोप्रा यांचं यश लाखो लोकांना प्रेरणा देतं. २०११ मध्ये त्या झोमॅटोमध्ये कर्मचारी म्हणून रुजू झाल्या. परंतु अवघ्या १० वर्षातच आकृती या कंपनीच्या सह-संस्थापक बनल्या. त्यांना 'फूड-टेक क्वीन ऑफ इंडिया' म्हणूनही ओळखलं जातं. झोमॅटोपूर्वी, आकृती यांनी पीडब्ल्यूसीमध्ये चीफ फायनान्शिअल ऑफिसर म्हणूनही काम केलं आहे. त्या चार्टर्ड अकाउंटंट आहेत.

आकृती यांनी दिल्लीच्या लेडी श्री राम कॉलेज फॉर वुमन (LSR) मधून शिक्षण घेतलंय. आपली स्थिर नोकरी सोडून झोमॅटोमध्ये सामील होण्याचा निर्णय पूर्णपणे त्यांचा होता. पालकांनीही त्यांच्या या निर्णयाला विरोध केला. पण, आकृती यांनी त्यांना ती गोष्ट पटवून दिली. चला तर मग जाणून घेऊया त्यांचा प्रवास.

आकृती चोप्रा चीफ पिपल ऑफिसर आणि Zomato च्या सह-संस्थापक आहेत. या कंपनीचं मूल्यांकन ५ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक आहे. झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल यांनी एका मुलाखतीत आकृती यांच्या अतूट वचनबद्धतेबद्दल आणि योगदानाबद्दल कौतुक केलं होतं. त्यांच्यामुळे मजबूत फायनान्शिअल टीम तयार झाली.

झोमॅटोमध्ये असताना आकृती चोप्रा यांनी लीगल, गव्हर्नन्स, रिस्क आणि कम्प्लायसन्ससह निरनिराळ्या टीम्ससह काम केलं. २०११ मध्ये त्या कंपनीत सीनिअर मॅनेजर (फायनान्स आणि ऑपरेशन्स) म्हणून रुजू झाल्या. मग त्यांनी झपाट्यानं प्रगती केली. २०१२ मध्ये त्या व्हीपी (फायनान्स आणि ऑपरेशन्स) बनली. २०२० मध्ये, आकृती सीएफओच्या भूमिकेत आल्या. २०२१ मध्ये, त्यांची सह-संस्थापक आणि चीफ पिपल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली.

१९८८ मध्ये आकृती यांचा जन्म झाला. त्या सध्या गुरुग्राममध्ये राहतात. त्यांनी डीपीएस, आरके पुरम येथून शिक्षण घेतलं आणि एलएसआरमधून बी.कॉम पूर्ण केलं. झोमॅटोमध्ये येण्यापूर्वी त्यांनी पीडब्ल्यूसीमध्ये तीन वर्षे काम केलं. २०२१ मध्ये Zomato चा आयपीओ आला तेव्हा आकृती यांच्या ESOP (कर्मचारी स्टॉक ओनरशिप प्लॅन) शेअर्सचं मूल्य १४९ कोटी रुपये होतं.

त्यांनी हे शेअर्स विकण्याचा निर्णय घेतला याची माहिती उपलब्ध नाही. पण, सर्वाधिक शेअर मूल्य असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी त्या एक होत्या. याशिवाय २०२१ मध्ये त्यांचा वार्षिक पगार १.६३ कोटी रुपये होता. आकृती चोप्रा यांनी ब्लिंकिटचे संस्थापक अलबिंदर ढींड यांच्यासोबत विवाह केला. ब्लिंकिट नंतर झोमॅटोनं विकत घेतलं.

आकृतीला यांना त्यांच्या योगदानासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. २०१७ मध्ये फोर्ब्स इंडियाच्या '३० अंडर ३०' यादीत त्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यांना २०१८ मध्ये 'वुमन ऑफ द इयर' पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं. आपल्या कठोर परिश्रमाने आणि समर्पणानं, कंपनीला भारतातील अग्रगण्या ऑनलाइ फूड डिस्ट्रिब्युशन सर्व्हिसमध्ये बदलण्याची त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.