Vodafone-Idea च्या रिचार्ज प्लॅन्सवर मिळणार हेल्थ इन्शुरन्स, रुग्णालयात दाखल झाल्यास मिळणार बेनिफिट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 11:19 AM2021-03-03T11:19:36+5:302021-03-03T11:29:50+5:30

Vodafone Idea : पाहा कोणत्या रिचार्जवर मिळणार ग्राहकांना हे बेनिफिट्स

सध्या दूरसंचार ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही ना काही नवं आणण्याचा प्रयत्न करत असतात. दरम्यान, एअरटेल, रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया यांसारख्या कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी नव्या स्कीम्स आणल्या आहेत.

परंतु आता व्होडाफोन आयडिया या कंपनीनं एक नवी स्कीम सुरू केली असून याअंतर्गत ग्राहकांना हेल्थ इन्श्युरन्सचे बेनिफिट्सही मिळणार आहेत.

व्होडाफोन आयडिया या कंपनीनं आदित्य बिरला हेल्थ इन्शुरन्स या कंपनीसोबत हातमिळवणी केली असून Vi Hospicare ही सेवा लाँच केली आहे.

यामध्ये कंपनीच्या प्रीपेड ग्राहकांना रुग्णालयात दाखल झाल्यास हेल्थ कवर मिळतं.

व्होडाफोन आयडियाच्या प्रीपेड सेवेच्या ग्राहकांना २४ तासांच्या कालावधीसाठी रुग्णालयात दाखल झाल्यास १००० रूपयांपर्यंतचं कव्हर मिळणार आहे.

याव्यतिरिक्त आयसीयूच्या खर्चासाठीही २ हजार रूपयांचं कव्हर मिळेल, असं कंपनीनं म्हटलं आहे.

या शिवाय कोरोना आणि पूर्वीपासून असलेल्या कोणत्याही आजारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यास त्यावरही हे बेनिफिट्स मिळणार आहेत.

Vi Hospicare या सेवेचा फायदा ग्राहकांना ५१ रूपये आणि ३०१ रूपयांच्या रिचार्जवर मिळणार आहे.

व्होडाफोन आयडियाच्या ५१ रूपयांच्या रिचार्जवर ग्राहकांना ५०० एसएमएस बेनिफिट्स देण्यात येतात. तर याची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे.

याव्यतिरिक्त आता यामध्ये ग्राहकांना १ हजार रूपयांचं हेल्थ बेनिफिटही मिळेल.

तर दुसरीकडे ३०१ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, १.५ जीबी डेटा, २ जीबी अतिरिक्त डेटा आणि १०० एसएमएसची सुविधा मिळते. याची व्हॅलिडिटी ३० दिवसांची आहे. या अंतर्गत ग्राहकांना आयसीयू ट्रिटमेंटसाठी २ हजार रूपये प्रति दिवसाचा फायदा मिळेल.

या सेवेचा लाभ १८ ते ५५ वर्षांपर्यंतच्या लोकांना घेता येईल. तर ५१ रूपये किंवा ३०१ रूपयांच्या प्रत्येक रिचार्जवर याचा कालावधी २८ दिवसांनी वाढेल.

परंतु यासाठी एक अट म्हणजे यासाठी सुरूवातीला ३० दिवसांचा वेटिंग पिरिअड लागू होणार आहे.

देशात अनेकदा मेडिकल इमरजन्सी असते. ज्या ठिकाणी लोकं आपण केलेल्या बचतीतून पैसे देत असतात. या खर्चाचा मोठा बोजा त्यांच्यावर पडतो, असं मत या करारावर बोलताना आदित्य बिरला हेल्थ इन्थुरन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मयंक बथवाल यांनी व्यक्त केलं.

आरोग्याशी निगडित असलेल्या सर्व सुविधा युनिव्हर्सल असल्या पाहिजेत आणि त्यात आवश्यक उपचारांसाठई हॉस्पीटलायझेशन बेनिफिट्ससोबत कोणत्याही वेळी क्लेमची सुविधा मिळाली पाहिजे, अशसं आदित्य बिरला हेल्थ इन्शुरन्सचं म्हणणं असल्याचंही त्यांनी सांगितलं.