कंपनीचा पहिला प्रोडक्ट : Nokia- टॉयलेट पेपर, Sony-राईस कुकर, Colgate-मेणबत्ती; पाहा यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 07:29 PM2022-09-16T19:29:53+5:302022-09-16T19:35:51+5:30

तुम्हाला माहितीये नोकिया फोन तयार करण्यापूर्वी काय करत होती? टोयोटानं कार तयार करण्यापूर्वी कशाचं उत्पादन सुरू केलं होतं? पाहूया प्रसिद्ध कंपन्यांची अशीच मजेशीर यादी.

तुम्ही नोकिया, सोनी, कोलगेट, टोयोटा अशा कंपन्यांची नावं नक्कीच ऐकली असतील. परंतु या कंपन्या आता जे काम करतायत त्याबद्दल सर्वांनाच माहित असेल. पण या कंपन्यांचा पहिला प्रोडक्ट कोणता होता असं म्हटलं तर तुम्हाला विचार करावा लागेल.

कधी विचार केलाय नोकिया मोबाइल फोन तयार करण्यापूर्वी काय करत होती किंवा टोयोटानं कारचं उत्पादन सुरू करण्यापूर्वी काय केलं होतं? पाहूया अशाच काही प्रसिद्ध कंपन्यांची माहिती ज्यांचे सुरूवातीचे प्रोडक्ट काही निराळेच होते आणि त्यांना ओळख आणखीच दुसऱ्या प्रोडक्टमुळे मिळाली. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर कंपन्यांच्या पहिल्या उत्पादनाशी संबंधित माहिती शेअर केली आहे.

नोकियाची सुरूवात पेपर मिल कंपनीपासून झाली होती. यानंतर कंपनीनं केबल, पेपर प्रोडक्ट, रबर बूट, टायर टीव्ही आणि मग मोबाइचं उत्पादन करत ओळख मिळवली. भारतात आपल्या मोबाइलमुळे ही कंपनी परिचयाची झाली. स्मार्टफोनच्या सुरूवातीच्या टप्प्यात भारतीय बाजारपेठेत नोकियाचा बोलबाला होता. परंतु त्यांचा पहिला प्रोडक्ट मोबाइल फोन नव्हता. कंपनी सुरूवातीच्या काळात टॉयलेट पेपर तयार करत होती.

सोनी आजच्या काळातील सर्वोत्तम कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने तयार करणाऱ्यांपैकी एक आहे. ही जपानी कंपनी चित्रपट आणि संगीत क्षेत्रातही व्यवसाय करते. मात्र, कंपनीला ओळख मिळाली ती केवळ तिच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांमुळे. पण सोनीचे पहिले ग्राहक उत्पादन म्हणजे इलेक्ट्रीक राइस कुकर. परंतु हे उत्पादन फारसे यशस्वी झाले नाही. यानंतर कंपनी टेपरेकॉर्डर बनवण्याकडे वळली.

कोलगेट हा देशातील टूथपेस्टचा लोकप्रिय ब्रँड असून तो सुरुवातीला साबण आणि मेणबत्त्या तयार करत असे. कोलगेट ही एक अमेरिकन कंपनी आहे जी सध्या टूथपेस्ट, टूथब्रश, माउथवॉश आणि डेंटल फ्लॉस यासारखी उत्पादने बनवते. कंपनीने प्रथम 1873 मध्ये माऊ क्लिनिंग प्रोडक्ट विकण्यास सुरुवात केली. कोलगेट टूथपेस्ट सुरूवातीला काचेच्या जारमध्ये विकले जात होते. 1896 पासून ते ट्यूबमध्ये विकले जाऊ लागले. कोलगेट 1950 च्या दशकात अॅलिसिया टोबिनने लिहिलेल्या घोषवाक्याने लोकप्रिय झाले.

आजच्या काळात फॉर्च्युनर सारखी उत्तम एसयूव्ही बनवणाऱ्या टोयोटा या जपानी कंपनीनेही आपले पहिले उत्पादन म्हणून कार बनवली नाही. पण कंपनीने कार व्यवसायातही नाव कमावले. टोयोटा इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनची स्थापना 1926 मध्ये झाली. स्वयंचलित यंत्रमाग तयार करणारी ही कंपनी पहिली होती. जपान सरकारने टोयोटा ऑटोमॅटिक लूम वर्क्सला ऑटोमोबाईल उत्पादनासाठी प्रोत्साहन दिले. चीनसोबतच्या युद्धामुळे देशांतर्गत वाहनांच्या उत्पादनाची गरज होती. यानंतर टोयोटाने 1933 मध्ये ऑटोमोटिव्ह उत्पादन विभागाची स्थापना केली आणि टोटाइप वाहने तयार करण्याची तयारी सुरू केली.

IKEA ही एक स्वीडिश कंपनी आहे जी फर्निचर, स्वयंपाकघरातील वस्तू, घरगुती वस्तूंची विक्री विकते. ही कंपनी 1943 मध्ये सुरू झाली. कंपनी सुरुवातीला पेन आणि लायटरसारखी छोटी उत्पादने विकायची. कंपनी प्रामुख्याने तिच्या नाविन्यपूर्ण फर्निचर डिझाइन्ससाठी ओळखली जाते.