याला म्हणतात शेअरची कमाल! 3 वर्षांत दिला 1500% परतावा; तेल, दारू बनवणाऱ्या कंपनीनं केलं मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 10:50 AM2023-10-25T10:50:29+5:302023-10-25T11:07:05+5:30

आता 10 भागांत विभागला जाणार शेअर...

शेअर बाजारात काही शेअर असेही असतात जे आपल्या ग्राहकांना फार कमी काळात मालामाल करून जातात. अशीच एक कंपनी म्हणजे, बीसीएल इंडस्ट्रीज. या तेल आणि तुपाचा व्यवसाय करणाऱ्या कंपनीने गेल्या केवळ 3 वर्षांतच आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 1500 टक्क्यांहूनही अधिकचा परतावा दिला आहे.

कंपनीचा शेअर 27 मार्च 2020 रोजी 31 रुपयांच्या जवळपास ट्रेड करत होता. आता या शेअरची किंमत 500 रुपयांच्याही वर पोहोचली आहे. मार्च 2020 पासून ते आतापर्यंत कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 1508 टक्क्यांचा बंपर परतावा दिला आहे. आता कंपनी आपल्या शेअर्सचे विभाजन (Split) करत आहे.

कंपनीची फेस व्हॅल्यू सध्या 10 रुपये आहे. जी आता एक रुपया केली जाईल. अर्थात कंपनीचा शेअर 10 भागांमध्ये विभागला जाईल. यामुळे ज्या गुंतवणूकदारांकडे, कंपनीचे 10 शेअर असतील, विभाजनानंतर त्यांची संख्या 100 होईल. या विभाजनाची एक्स डेट 27 ऑक्टोबर ठेवण्यात आली आहे.

एक्स डेटच्या एक दिवस आधी अर्थात 26 ऑक्टोबरपर्यंत जे लोक या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करतील ते विभाजनासाठी पात्र असतील. यापूर्वीही कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस दिला आहे.

12 ऑक्टोबर 1992 मध्ये बीसीएल इंडस्ट्रीजने 1:1 या प्रमाणात बोनसची घोषणा केली होती. अर्थात कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना एका शेअरसोबत एक शेअर बोनस म्हणून दिला होता.

असा आहे कंपनीचा व्यवसाय? - बीसीएल इंडस्ट्रीज एफएमसीजी उद्योगाशी संबंधित आहे. ही कंपनी वनस्पती तूप, रिफाइंड खाद्यतेल आणि इतरही काही उत्पादने बनवते. याशिवाय कंपनी दारू आणि रिअल इस्टेट व्यवसायातही काम करते.

काही दिवसांपूर्वी, कंपनी आपल्या बिझनेसमध्ये बदल करण्याच्या तयार असल्याचेही वृत्त होते. यानुसार, आता कंपनी आपल्या डिस्टिलरीज (दारू) व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे. कंपनीच्या बोर्डाने भटिंडा डिस्टिलरी बांधण्यासाठी भटिंडा ऑइल युनिटला मंजुरीही दिली आहे.

सोमवारी शेअर घसरला - सोमवारी बाजार खुला झाल्यानंतर, या शेअरमध्ये जवळपास 3.5 टक्क्यांची घसरण झाली. बीएसईवर हा शेअर 502 रुपयांच्या जवळपास बंद झाला. कंपनीचे मार्केट कॅप 1250 कोटी रुपये एवढे आहे. अर्थात ही एक स्मॉलकॅप कंपनी आहे.

गेल्या 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरमध्ये 376 टक्क्यांची तेजी आली आहे. तर 10 वर्षांचा विचार करत 3500 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. मात्र, कोरोनातील घसरणीनंतर कंपनीने जबरदस्त कमबॅक केला असून कंपनीच्या शेअरने केवळ 3 वर्षांतच 1500 टक्क्यांपर्यंतचा परतावा दिला आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)