अरे व्वा! 'या' तीन बँकांच्या ग्राहकांसाठी खुशखबर, ATM मधून कितीही वेळा पैसे काढता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 04:53 PM2021-06-13T16:53:56+5:302021-06-13T17:00:20+5:30

बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी महिनाभरासाठीची ठराविक मर्यादा संपली की पैसे काढण्यासाठी ग्राहकांवर अतिरिक्त शुल्क आकारलं जातं. पण देशातील तीन बँकांनी आता नियमात बदल करुन ग्राहकांना मोठी सूट दिली आहे.

'एटीएम'मधून पैसे काढण्यासाठी तुमच्या बँकेनं ठरवून दिलेली मर्यादा संपल्यानंतर पुढील प्रत्येक व्यवहारासाठी अतिरिक्त शुल्कात वाढ करण्याची परवानगी भारतीय रिझर्व्ह बँकेनं दिली आहे. बँकांना हायर इंटरचेंज चार्ज आणि एटीएम ऑपरेशनल कॉस्टमध्ये वाढ करण्याची परवानगी आरबीयआयनं दिली.

सध्या भारतात अनेक खासगी आणि सरकारी बँका शहरी भागात दरमहा ३ ते ५ वेळा एटीएम विनाशुल्क वापरण्याची मुभा देतात. पण त्यावरील वापरासाठी शुल्क आकारलं जातं. दरम्यान, ग्रामीण भागांमध्ये ग्राहकांना दरमहा कोणत्याही शुल्कविना एटीएम पाच वेळा वापरता येतं.

पण बँक तुमच्याकडून एटीएम चालू ठेवण्यासाठी शुल्क आकारतं. दरम्यान काही बँका अशा देखील आहेत की ज्या आपल्या ग्राहकांना विनाशुल्क एटीएम वापराची सेवा देतात.

रोखरक्कम काढण्यासाठी आकरण्यात येणारं शुल्क २० रुपयांवरुन आता २१ रुपये करण्यात आलं आहे. त्याचपद्धतीनं बँकांच्या इंटरचेंज चार्ज रुपात आकारण्यात येणारं शुल्क देखील १६ रुपयांवरुन १७ रुपये करण्यात आलं आहे.

दरम्यान, देशात अशा तीन बँका आहेत की ज्यांनी आपल्या ग्राहकांना अनलिमिटेड फ्री एटीएम वापराची मुभा दिली आहे. यात इंडसइंड बँक (IndusInd Bank), आयडीबीआय बँक (IDBI Bank) आणि सिटी बँकेचा (Citi Bank) समावेश आहे.

पण सिटी बँक सध्या भारतातील व्यवहार बंद करण्याच्या मार्गावर आहे. तर आयडीबीआय आणि इंडसइंड बँक देशातील आपल्या सर्व ग्राहकांना विनाशुल्क अनलिमिटेड एटीएम ट्रान्झाक्शनची सेवा देणं सुरू ठेवणार आहेत.

बँक बाजारनं दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही आयडीबीआय बँकेचे ग्राहक असाल किंवा ग्राहक होऊ इच्छित असाल तर बँकेकडून ग्राहकांना अनलिमिटेड एटीएम वापराची सेवा दिली जाते याची माहिती करुन घ्या. तर आयडीबीआय व्यतिरिक्त इतर बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्याची मासिक मर्यादा ५ ट्रान्झाक्शन इतकी आहे.

इंडसइंड बँक भारतात कोणत्याही बँकेच्या एटीएममधून विनाशुल्क पैसे काढण्याची सुविधा प्रदान करतं. बँकेच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार देशात कुठेही आणि कोणत्याही एटीएममध्ये इंडसइंड बँकेचं एटीएम डेबिड कार्डमधून अनलिमिटेड विनाशुल्क रक्कम काढू शकता.