टाटाच्या या दिग्गज कंपनीची धमाल! गुंतवणूकदारांना केलं मालामाल, रेखा झुनझुनवालांची संपत्ती झटक्यात 890 कोटी पार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 16:27 IST2026-01-07T16:07:01+5:302026-01-07T16:27:02+5:30

हा शेअर आज ५ टक्क्यांनी वधारत ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला आहे...

शेअर बाजारात घसरणीचे वातावरण असतानाच टाटा समूहातील दिग्गज कंपनी असलेल्या 'टायटन'च्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी दिसून आली आहे. हा शेअर आज ५ टक्क्यांनी वधारत ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला आहे.

कंपनीच्या ग्राहक व्यवसायात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ४० टक्क्यांची वाढ झाली आहे. सणासुदीच्या काळातील प्रचंड मागणी आणि प्रीमियम उत्पादनांना मिळणारी पसंती हे या दरवाढीचे मुख्य कारण आहे.

दिग्गज गुंतवणूकदार दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांची टायटनमध्ये तब्बल ५.३२% एवढी हिस्सेदारी आहे. आजच्या तेजीमुळे त्यांची संपत्ती झटक्यात 890 कोटी रुपयांहूनही अधिक झाली आहे.

बीएसई (BSE) वर टायटनचा शेअर ४.८ टक्क्यांनी वधारला असून ४,३०९ रुपयांच्या नव्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. डिसेंबर तिमाहीच्या आकडेवारीनुसार, कंपनीच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायात तब्बल ७९% तर भारतीय व्यवसायात ३८% वाढ नोंदवण्यात आली आहे.

याच कालावधीत कंपनीने ५६ नवीन स्टोअर्स सुरू केले आहेत. आता टायटनच्या एकूण स्टोअर्सची संख्या ३,४३३ वर पोहोचली आहे.

पुढील लक्ष्य काय? ब्रोकरेज फर्म 'नोमुरा'ने टायटनच्या शेअरसाठी 'बाय' रेटिंग आणि ४,५०० रुपये कायम ठेवले आहे. जी सध्याच्या किमतीपेक्षा १० टक्क्यांनी अधिक आहे. नोमुराने म्हटले आहे की, भारतातील वाढती उच्च उत्पन्न गटातील लोकसंख्या टायटनसाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वास ब्रोकरेजने व्यक्त केला आहे.

मध्यम मुदतीत कंपनीची विक्री १.५ ते २ पटीने वाढण्याची शक्यता आहे. दागिन्यांच्या क्षेत्रात वेगाने विस्तार करणारी टायटन आता निमशहरी आणि छोट्या शहरांमध्येही आपले जाळे पसरवत आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)