TATA ग्रुपचा धोबीपछाड! मार्केट कॅपमध्ये नंबर १ वर; रिलायन्सला मागे टाकत ‘ही’ कंपनी दुसऱ्या स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 07:49 PM2021-11-23T19:49:18+5:302021-11-23T20:20:05+5:30

TATA ग्रुपच्या तब्बल २९ कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध असून, मार्केट कॅपमध्ये अव्वल स्थानी आहे.

कोरोना काळातही TATA ग्रुपमधील अनेक कंपन्यांनी दमदार कामगिरी करत यशस्वी घोडदौड कायम ठेवली आहे. इतकेच नव्हे, तर टाटा ग्रुपच्या एका कंपनीने गुंतवणूकदारांना तब्बल १ हजार टक्के परतावा देत मालामाल केले आहे.

TATA ग्रुपच्या काही कंपन्यांमध्ये बिग बुल म्हणून ओळख असलेल्या राकेश झुनझुनवाला यांनीही गुंतवणूक वाढवली आहे. यामुळे टाटाच्या कंपन्यांचे शेअर्स आणखीन वाढत चालल्याचे असल्याचे सांगितले जात आहे.

शेअर मार्केटमध्ये सर्वाधिक सूचीबद्ध कंपन्या TATA ग्रुपच्या आहेत. आतापर्यंत अनेकविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या TATA ग्रुपच्या एकूण २९ कंपन्या शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध झालेल्या आहेत.

तर, खासगी क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या HDFC बँकेने रिलायन्स ग्रुपला मागे टाकत मार्केट कॅपमध्ये दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. शेअर बाजारातील सततची घसरण आणि सौदी अरामकोसोबत रद्द झालेला करार याचा मोठा फटका Reliance ला बसला आहे. Reliance इंडस्ट्रीजचे शेअर्स तब्बल ४ टक्क्यांनी घसरले आहेत.

Reliance इंडस्ट्रीजच्या पडझडीमुळे रिलायन्सचे मार्केट कॅप NSE वर ७० हजार कोटींनी घटले. NSE वर रिलायन्सचे मार्केट कॅप १४.९९ लाख कोटींवर आले आहे. यामुळे रिलायन्स तिसऱ्या स्थानावर गेले आहे. तर HDFC ग्रुपने रिलायन्सला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे.

HDFC ग्रुपचे एकूण मार्केट कॅप आता १५.५६ लाख कोटींवर गेले आहे. शेअर मार्केटमध्ये HDFC ग्रुपमधील एचडीएफसी बँक आघाडीवर असून, त्यांचे मार्केट कॅप ९.२४ लाख कोटी रुपये आहे. तर, एचडीएफसी लिमिटेड दुसऱ्या क्रमांकावर असून, त्यांचे मार्केट कॅप ५.२३ लाख कोटींवर गेले आहे.

रिलायन्सच्या १० कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध असून, HDFC ग्रुपच्या ५ कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत. तर समूह मार्केट कॅपमध्ये चौथ्या स्थानी अदानी ग्रुप आहे. अदानी ग्रुपचे मार्केट कॅप ९ लाख कोटींवर आहे. तर या समूहाच्या ४ कंपन्या सूचीबद्ध आहेत.

तर मार्केट कॅपमध्ये क्रमांक एक वर असलेल्या TATA ग्रुपचा मार्केट कॅप २१.९९ लाख कोटींवर गेला आहे. १८ ऑक्टोबर रोजी TATA ग्रुपचा मार्केट कॅप २३.६९ लाख कोटींवर होता. मात्र, त्यात १.७० लाल कोटींची घसरण झाली. TATA ग्रुपमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) या कंपनीचा शेअर सर्वाधिक असून, टीसीएसचा मार्केट कॅप १२.८० लाख कोटी आहे.

TATA ग्रुपमधील टीसीएसनंतर टायटन कंपनीचा मार्केट कॅप दुसऱ्या क्रमांकावर आहे. Titan कंपनीचा मार्केट कॅप २.२९ लाख कोटी आहे. शेअर मार्केटमधील सूचीबद्ध ग्रुपचे एकूण मार्केट कॅप २७४ लाख कोटींवर आहे.

दरम्यान, TATA ग्रुपमधील ही कंपनी म्हणजे टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड (TTML) आहे. TTML च्या या कंपनीचे शेअर्स गेल्या काही दिवसांपासून सतत तेजीत असून, सलग तीन दिवस ५ टक्क्यांचे सर्किट लागत असल्याचे सांगितले जात आहे.

तज्ज्ञांच्या मते, TTML कंपनीतील तेजी आणखी काही दिवस अशीच कायम राहू शकते. तसेच या स्तरावरील शेअर्समुळे नफावसुलीही पाहायला मिळू शकते, असे सांगितले जात आहे. TTML ही टाटा टेलिसर्व्हिसेसची सब्सिडियरी कंपनी आहे.

TTML आपल्या सेगमेंटमधील आघाडीवर असणारी कंपनी आहे. या कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत अनेकविध बड्या कंपन्यांचा समावेश आहे. गेल्या महिन्यात या कंपनीने स्मार्ट इंटरनेट बेस सर्व्हिस कंपनी सुरू केली असून, याला तुफान प्रतिसाद मिळत आहे. यामुळेच या कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत.

TTML कंपनीच्या शेअर्सची किंमत १७ नोव्हेंबर २०२० रोजी केवळ ९ रुपये होती. त्यावेळी १२ हजार रुपयांमध्ये १३३४ शेअर्स मिळाले असते आणि आता १७ नोव्हेंबर रोजी त्याचीच किंमत १.१ लाख रुपये झाली, असे सांगितले जात आहे.

तसेच TTML कंपनीचे कमाई दिवसेंदिवस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या सहा महिन्यांत कंपनीचा तोटा १४१० कोटींनी घसरून ६३२ कोटींवर आला आहे. या कंपनीत प्रमोटर्सचा हिस्सा सर्वाधिक असून, कंपनीसाठी ही बाब चांगली आहे, असे म्हटले जात आहे.

TTML मध्ये Tata Sons चा ७४.३ टक्के हिस्सा आहे. तर रिटेल गुंतवणूकदारांचा या कंपनीतील हिस्सा २६.६ टक्के आहे. टाटा सन्स या कंपनीसंदर्भात मोठी योजना आखत असून, भविष्यात या कंपनीला Tata Tele Business Services (TTBS) नावाने लॉंच केले जाऊ शकते, असे सांगितले जात आहे.