जबरदस्त कमाई! टाटा, रिलायन्स विकतायत EMI वर सोनं-चांदी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 11:35 AM2023-09-25T11:35:48+5:302023-09-25T11:39:53+5:30

तनिष्कपासून रिलायन्स रिटेलपर्यंत सोन्याची खरेदी ईएमआयवर होताना दिसत आहे. अहवालानुसार, EMI मध्ये सोने खरेदी करण्याचा ट्रेंड ५० टक्क्यांहून अधिक वाढला आहे.

२०२३ मध्ये सोन्याच्या किमतीत गतवर्षीप्रमाणे वाढ झाल्याचे दिसले नाही, पण तरीही सोने खरेदीला थोडा ब्रेक नक्कीच लागला आहे. यांचे कारण म्हणजे सध्या ५९ ते ६० हजार रुपयांच्या दरम्यान असलेल्या किमती. यामुळेच आता भारतातील ब्रँडेड रिटेल स्टोअरमध्ये सोने ईएमआयवर खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.

EMI मध्ये सोने खरेदीच्या वाढीत ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे या ब्रँडेड रिटेलर्सच्या कमाईत वाढ झाली आहे. यामध्ये टाटा आणि रिलायन्स या दोघांचाही समावेश आहे.

ज्वेलरी खरेदी योजनेंतर्गत, ग्राहक दर महिन्याला ज्वेलर्सकडे एक निश्चित रक्कम जमा करतात आणि तेवढ्या रकमेचे सोन्याचे दागिने एका कालमर्यादेत मिळतात. ही एक प्रकारची EMI योजना आहे. यामध्ये तुम्ही दरमहा थोडे पैसे जमा करून सोन्याचे दागिने खरेदी करू शकता.

टाटा समूहाच्या तनिष्क ब्रँडला आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ठेव योजनेद्वारे ३,८९० कोटी रुपये मिळाले, जे गेल्या आर्थिक वर्षातील २,७०१ कोटी रुपयांपेक्षा ४४ टक्के जास्त आहे. वार्षिक अहवालानुसार, रिलायन्स रिटेलने अशा प्रकारे सोने विकून २८२ कोटी रुपये कमावले आहेत, जे एका वर्षापूर्वी १८४ कोटी रुपयांपेक्षा जास्त होते.

सहसा, किरकोळ विक्रेते ठेवीदारांना प्रोत्साहन म्हणून हप्त्यांवर काही सूट देतात. तनिष्कचे गोल्डन हार्वेस्ट १० महिन्यांच्या योजनेसाठी पहिल्या हप्त्यावर ७५ टक्के सूट देते.

प्रादेशिक साखळींनीही मासिक ठेव योजना स्वीकारल्या आहेत. महाराष्ट्र आणि गोव्यात ४२ स्टोअर्स चालवणाऱ्या पुण्यातील PNG ज्वेलर्सला FY2023 मध्ये ७०० कोटी रुपये मिळाले, जे FY2022 पेक्षा २७ टक्क्यांनी जास्त आहे. कोलकातास्थित सेन्को गोल्डला गेल्या आर्थिक वर्षात ठेवी म्हणून १९२ कोटी रुपये मिळाले, जे एका वर्षापूर्वीच्या तुलनेत ८९ टक्क्यांनी अधिक आहे.

टायटन कंपनीच्या एका अधिकाऱ्याने दिलेली माहिती अशी, कोविड काळात सोन्याचे दागिने खरेदी योजनेवर परिणाम झाला होता, पण आता त्याला गती मिळाली आहे. या आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत, मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत योजनेतील नामांकनांमध्ये ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तनिष्कच्या विक्रीतील दागिने खरेदी योजनेचा वाटा गेल्या आर्थिक वर्षात १९ टक्के होता आणि यावर्षी तो २१ टक्क्यांपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे.

पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष सौरभ गाडगीळ म्हणाले की, त्यांच्या विक्रीतील सुमारे २० टक्के सोने खरेदी योजना दागिन्यांच्या खरेदीतून येतात. सुरुवातीला सोन्याचे भाव वाढल्याने विक्रीत मोठी घट झाली होती, पण आता ग्राहकांना या किमतीची सवय झाली. आगामी सणासुदीच्या काळात या योजनेत अधिक नामांकन मिळण्याची आम्हाला अपेक्षा आहे.

जागतिक सुवर्ण परिषदेच्या मते, भारताचा एकूण सोन्याचा वापर कॅलेंडर वर्ष २०२२ मध्ये २.९ टक्क्यांनी घटून ७९७.३ टनांवरून २०२१ मध्ये ७७४ टन झाला. या वर्षी, विक्रमी उच्च किमतींमुळे किरकोळ खरेदीत घट झाल्यामुळे सोन्याच्या मागणीत वर्षानुवर्षे १० टक्के घट झाल्याचा अंदाज परिषदेचा आहे, जो तीन वर्षांतील सर्वात कमी आहे. यूएस बँकिंग संकटानंतर, सोन्याचा भाव जानेवारीमध्ये ५५,३०० रुपये प्रति १० ग्रॅमवरून वाढून मार्चमध्ये ६०,००० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. त्यानंतर सोन्याचा भाव ५९,२०० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​आला आहे.