TATA ग्रुप आता ‘ही’ सरकारी कंपनी खरेदी करण्यास इच्छुक; केंद्राने दिली तत्त्वतः मंजुरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 09:46 AM2021-08-18T09:46:01+5:302021-08-18T09:53:21+5:30

आता TATA ग्रुपमधील Tata Steel केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेली एक स्टील कंपनी खरेदी करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे.

आताच्या घडीला TATA ग्रुप अनेकविध क्षेत्रात दमदार कामगिरी करत आहे. TATA ग्रुपच्या अनेक कंपन्या भन्नाट रिटन्सही देत आहेत. तसेच टाटा आता नवनव्या क्षेत्रातही पदार्पण करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

TATA ग्रुप देशातील सर्वांत यशस्वी उद्योगांपैकी एक असून, ऑटोमोबाइल, विमान, इन्सुरन्स, स्टील, केमिकल अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये TATA ग्रुपने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

आता TATA ग्रुपमधील Tata Steel केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेली एक स्टील कंपनी खरेदी करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. टाटा स्टीलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक टी. व्ही. नरेंद्रन यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

केंद्रीय स्टील मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड (RINL) कंपनी टाटा स्टील खरेदी करण्यास उत्सुक आहे. RINL ही कंपनी विशाखापट्टनम येथे स्थित असून, भारताचा पहिला तटीय प्रकल्प असण्याचा मान या कंपनीला मिळाला आहे.

RINL ची क्षमता ७३ लाख टन असून, या कंपनीकडे सुमारे २२ हजार एकर जमीन आहे. तसेच गंगावरम बंदरापर्यंत या कंपनीचा विस्तार असल्याचे सांगितले जात आहे. RINL या कंपनीला विशाखापट्टनम इस्पात संयंत्र किंवा वायझॅग स्टील (Vizag Steel) या नावानेही ओळखले जाते.

केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहाराच्या मंत्रिमंडळाने २७ जानेवारी २०२१ रोजी RINL च्या विक्रीला तत्त्वतः मंजुरी दिली होती. १८ फेब्रुवारी १९८२ मध्ये RINL ची स्थापना करण्यात आली होती. आताच्या घडीला या कंपनीत जवळपास १६ हजार ८०० कर्मचारी काम करतात.

Tata Steel चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक टी. व्ही. नरेंद्रन यांनी म्हटले आहे की, होय, अधिग्रहणाच्या माध्यमातून कंपनीचा विस्तार करण्याची ही मोठी संधी आहे. कारण पूर्व आणि दक्षिणेपर्यंत या कंपनीचा विस्तार आहे. हा एक तटीय प्रकल्प असल्यामुळे याचे अनेक फायदे आहेत, असे ते म्हणाले.

Tata Steel ने ओडिशा येथील नीलांचल इस्पात निगम लिमिटेड (NINL) ही कंपनीही खरेदी करण्यासाठी इच्छा व्यक्त केली असून, त्यासाठीचा अर्जही सादर करण्यात आला आहे. NINL हा संयुक्त उपक्रम असून, याअंतर्गत एमएमटीसी, राष्ट्रीय खनिज विकास निगम (NMDC), भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) आणि मेकॉन तसेच ओडिशा सरकारच्या दोन कंपन्या आयपीआयसीओएल आणि ओडिशा माइनिंग कॉरपोरेशन (OMC) ची हिस्सेदारी आहे.

दरम्यान, रतन टाटांच्या TCS चे बाजारमूल्य १३ लाख १२ हजार ९९६ कोटींवर पोहोचले असून, मुकेश अंबानीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजपासून काही पाऊले दूर आहे. Reliance इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य १३.८९ लाख कोटी रुपये आहे. मार्केट कॅपमध्ये TCS दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहे.

बाजारमूल्यानुसार देशातील दुसरी सर्वांत मोठी कंपनी TCS चा हिस्सा १.३९ टक्क्यांनी वाढून ३,५२० रुपयांच्या सर्व उच्चांकावर पोहोचला. बीएसईवर हा स्टॉक ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचल्याने बाजारमूल्य १३.१२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

TCS म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीला एप्रिल ते जून या महिन्यांत म्हणजेच चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत तब्बल ९ हजार ००८ कोटींचा निव्वळ नफा झाला असून, तो २८ टक्क्यांनी वाढल्याचे सांगितले जात आहे.

गतवर्षी याच कालावधीत कंपनीला ७ हजार ००८ कोटींचा नफा झाला होता. तर, चालू आर्थिक वर्षात कंपनीचे एकत्रित उत्पन्नही १८.५ टक्क्यांनी वाढून ४५,४११ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गतवर्षी याच कालावधीत कंपनीचे उत्पन्न ३८,३२२ कोटी रुपये होते.

TCS ही TATA ग्रुपची देशातील सर्वांत मोठी खासगी कंपनी आहे आणि त्यात ५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करतात. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कंपनी कॅम्पसमधून ४० हजार फ्रेशर्स घेणार आहे. TCS मधून नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही खूप कमी आहे. या कंपनीचा कर्मचारी कायम ठेवण्याचा दर ८.६ टक्के आहे, जो देशातील सर्वांत कमी आहे.