TATA नंबर १ होणार? विस्तारासह ४ एअरलाइन्स Air India मध्ये विलीन करणार; जगात दबदबा वाढणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 06:01 PM2022-11-19T18:01:53+5:302022-11-19T18:05:47+5:30

टाटा ग्रुप एअर इंडिया, एअर एशिया, विस्तारा आणि एअर इंडिया एक्सप्रेस यांचे संचालन करत असून, सर्व कंपन्या एअर इंडियात विलीन करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

अलीकडेच TATA ग्रुपच्या टाटा सन्सने Air India ची बोली जिंकली आणि एअर इंडियाची सहा दशकांनंतर परत टाटा ग्रुपमध्ये घरवापसी झाली. यानंतर Air India ची कामगिरी आणि क्षमता सुधारण्यावर टाटा ग्रुपने मोठ्या प्रमाणावर भर दिला. तसेच अनेक प्रकारच्या सुधारणाही घडवून आणल्या.

टाटा समूह आपले चार एअरलाइन ब्रँड एअर इंडिया अंतर्गत विलीन करण्याचा आणि विस्तारा ब्रँड रद्द करण्याचा विचार करत आहे. ढासळलेल्या विमान वाहतूक साम्राज्याला नवसंजीवनी देण्याचा एक भाग म्हणून टाटा या मुद्द्यावर विचार करत असल्याचे सांगितले जात आहे.

विस्तारा एअरलाइन्स ही टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाइन्स यांचा संयुक्त उपक्रम आहे. सिंगापूर एअरलाइन्सने एका निवेदनात म्हटले आहे की, SIA आणि टाटा समूह यांच्यात चर्चा सुरू आहे. SIA आणि टाटा सध्याची भागीदारी अधिक दृढ करण्याचा विचार करत आहेत. यासाठी विस्तारा आणि एअर इंडियाचे एकत्रीकरणही करता येईल.

टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाइन्स लिमिटेड भारतात विस्तारा एअरलाइन्स चालवतात. सिंगापूर एअरलाइन्सचा या एअरलाइनमध्ये ४९ टक्के हिस्सा आहे, तर टाटा समूहाचा ५१ टक्के हिस्सा आहे. टाटा समूह 'एअर एशिया इंडिया'चे 'एअर इंडिया एक्सप्रेस'मध्ये विलीनीकरण करण्याचाही विचार करत आहे. या विलीनीकरणाला स्पर्धा आयोगाने मान्यता दिली आहे.

विस्तारामध्ये सिंगापूर एअरलाइन्स लिमिटेडची हिस्सेदारी आहे. विस्तारा एअरलाइन्सने ९ जानेवारी २०१५ रोजी टाटा आणि सिंगापूर एअरलाइन्सच्या कराराने भारतात पहिले उड्डाण केले. मे २०१९ पर्यंत, कंपनीचा भारतीय विमान बाजारपेठेत ४.७ टक्के वाटा होता.

टाटा सन्सने जानेवारीमध्ये एअर इंडिया खरेदी केल्यानंतर व्यवस्थापनावर नियंत्रण मिळवले. तेव्हापासून त्यांनी आपल्या चारही विमान कंपन्यांना एकत्र करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. या प्रक्रियेअंतर्गत, एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, विस्तारा, एअर एशिया इंडिया आणि ग्राउंड हँडलिंग फर्म AISATS एकाच कार्यालयातून काम करतील.

गेल्या वर्षी टाटा सन्सने १८ हजार कोटींची बोली लावून एअर इंडिया विकत घेतली होती. त्यानंतर २७ जानेवारी २०२२ रोजी एअर इंडिया टाटाकडे सोपवण्यात आली. एअर इंडियाच्या अधिग्रहणापूर्वी टाटाकडे विस्तारा आणि एअर एशिया या दोन एअरलाईन्स ब्रँड होत्या.

पण एअर इंडियाचे अधिग्रहण केल्यानंतर टाटांना एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसचे ब्रँडही मिळाले. एअर इंडियाचा सध्या देशांतर्गत बाजारातील हिस्सा १० टक्के आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील हिस्सा १२ टक्के आहे.

कंपनी पुढील पाच वर्षात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ३० टक्के वाटा देण्याचे लक्ष्य घेऊन चालत आहे. दरम्यान, एअर इंडियाच्या क्षमतेबद्दल बोलायचे झाले तर, ताफ्यात ११३ विमाने आहेत.

विस्ताराच्या ताफ्यात ५४ विमाने आहेत. एअर इंडियाकडे बोईंग आणि एअरबस विमानांचे ११ प्रकार आहेत, तर विस्ताराकडे फक्त पाच विमाने आहेत. टाटा समूहाने एअर इंडियाच्या विस्तार योजनेबद्दल सांगितले होते. याअंतर्गत लवकरच ताफ्यात ३० नवीन विमानांचा समावेश करण्यात येणार आहे. समूहाने २५ एअरबस नॅरो बॉडी आणि ५ बोईंग वाइड बॉडी विमाने भाड्याने तयार केली आहेत.