TATA ग्रुपचा मेगा प्लान! ‘या’ ३ राज्यांत सेमीकंडक्टर प्रकल्प उभारणार; ४ हजार रोजगार मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 10:31 AM2021-11-27T10:31:42+5:302021-11-27T10:37:45+5:30

काही महिन्यांपूर्वीच TATA ग्रुपने सेमीकंडक्टर क्षेत्रात उतरण्यासंदर्भात सूतोवाच केले होते.

गेल्या अनेक महिन्यांपासून ऑटोमोबाइल क्षेत्राला सेमीकंडक्टर चीपच्या तुटवड्याचा गंभीर सामना करावा लागत आहे. यामुळे वाहनांच्या निर्मितीवर मोठा परिणाम झाला असून, मागणी असूनही वाहने उत्पादित करून वितरीत करण्यात अडचणी निर्माण होत आहे. कोरोना संकट काळापासून सेमीकंडक्टर चीपचा तुटवडा गंभीर विषय बनलेला आहे.

कोरोना संकटापासून हळूहळू जागतिक अर्थव्यवस्था सावरताना दिसत आहे. अनेक क्षेत्रे पुन्हा नव्या जोमाने सुरू झाले आहेत. भारतातील फेस्टिव्ह सीझनमध्ये वाहन खरेदी जोमात असल्याचे पाहायला मिळाले. मात्र, सेमीकंडक्टरच्या मोठ्या कमतरतेमुळे ऑटोमोबाइल कंपन्यांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे.

अशातच आता TATA ग्रुपने मोठी योजना आखली असून, देशातील तीन राज्यांमध्ये सेमीकंडक्टर असेंबली प्रकल्प उभारण्यावर मोठ्या प्रमाणात काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, टाटा समूह यासाठी २२५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

TATA ग्रुपची आउटसोर्स्ड सेमीकडंक्टर असेंबली प्रकल्पासाठी तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगण या राज्यांशी चर्चा सुरू आहे. तसेच या राज्यांमध्ये जमीन अधिग्रहणाबाबतही बोलणी सुरू असून, लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले जात आहे.

रॉयटर्सनुसार, टाटा ग्रुप सेमीकंडक्टर असेंबली प्रकल्पाबाबत पुढील महिन्यात सर्व गोष्टी अंतिम करू शकतो. TATA ग्रुप सॉफ्टवेअरच्या बाबतीत अद्ययावत, अग्रेसर आणि मजबूत असून, आता हार्डवेअरच्या बाबतीतही टाटा समूहाला मजबूत व्हायचे आहे, असे सांगितले जात आहे.

TATA ग्रुप यासाठी इंटेल, एएमडी आणि एसटी मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स यांच्याशी करार करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सन २०२२ पर्यंत टाटा ग्रुपचा हा सेमीकंडक्टर असेंबली प्रकल्प कार्यान्वित होऊ शकेल आणि यामुळे सुमारे ४ हजारांवर रोजगार निर्मिती होऊ शकेल, असे म्हटले जात आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच TATA ग्रुपने सेमीकंडक्टर क्षेत्रात उतरण्यासंदर्भात सूतोवाच केले होते. आताच्या घडीला सेमीकंडक्टर क्षेत्रात चीनची मक्तेदारी आहे. यासंदर्भात टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी याबाबत माहिती दिली होती.

भारताच्या ऑटोमोबाइल क्षेत्रात सेमीकंडक्टरची वाढती मागणी आणि कोरोना संकटामुळे जागतिक स्तरावर निर्माण झालेली चणचण या पार्श्वभूमीवर TATA ग्रुपने पाऊल उचलले असून, आता सेमीकंडक्टर तयार करण्याच्या क्षेत्रात उतरणार आहे.

इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाची जागतिक बाजारपेठ सुमारे १ ट्रिलियन डॉलर आहे. TATA ग्रुपने या मार्केटमध्ये हिस्सा मिळण्याच्या संधींचे आधीच नवीन व्यवसाय उभारले आहेत.

सेमीकंडक्टर निर्मितीसाठी प्रचंड गुंतवणुकीची आवश्यकता असते. सध्या जागतिक पुरवठा साखळी पूर्णपणे चीनवर अवलंबून आहे आणि भारतात कोणतीही कंपनी सेमीकंडक्टर तयार करत नाही. यात कोरोना संकटाची भर आणि राजकीय कारणांमुळे कंपन्या आता इतर देशावर अवलंबून आहेत.

अशा स्थितीत भारताला सेमीकंडक्टर निर्मितीचे जगातील दुसरे सर्वांत मोठे केंद्र बनण्याची चांगली संधी आहे, असे चंद्रशेखरन यांनी सांगितले होते. सेमीकंडक्टर म्हणजे एक प्रकारच्या सिलिकॉन चिप्स आहेत.

हे सेमीकंडक्टर गाड्या, कम्प्युटर आणि मोबाइलपासून अन्य अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये वापरले जातात. हे सेमीकंडक्टर कंट्रोल आणि मेमरी फंक्शनशी संबंधित काम अधिक चांगल्या प्रकरे करते. अलीकडील काळात ऑटोमाबाइल उद्योगात सेमीकंडक्टर्सचा वापर जगभरात वाढला आहे.

TATA ग्रुप देशातील सर्वांत यशस्वी उद्योगांपैकी एक असून, ऑटोमोबाइल, विमान, इन्सुरन्स, स्टील, केमिकल अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये टाटा ग्रुपने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

Read in English