दरवर्षी जमा करा १.५ लाख, मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; मुलीच्या भविष्यासाठी सुरक्षित आहे सरकारी स्कीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 09:20 IST2025-11-21T09:04:33+5:302025-11-21T09:20:21+5:30

Sukanya Samriddhi Yojana: मुलीच्या भविष्याची योजना आखणाऱ्या पालकांसाठी ही योजना आजही सर्वात विश्वसनीय आणि फायदेशीर पर्यायांपैकी एक आहे. जर तुम्ही दरवर्षी जास्तीत जास्त ₹ १,५०,००० जमा करण्याचा विचार करत असाल, तर २१ वर्षांच्या मुदतीनंतर मोठी रक्कम जमा होईल.

Sukanya Samriddhi Yojana: मुलीच्या भविष्याची योजना आखणाऱ्या पालकांसाठी सुकन्या समृद्धी योजना (SSY) आजही सर्वात विश्वसनीय आणि फायदेशीर पर्यायांपैकी एक आहे. जर तुम्ही दरवर्षी जास्तीत जास्त ₹ १,५०,००० जमा करण्याचा विचार करत असाल, तर २१ वर्षांच्या मुदतीनंतर (Maturity) तुमच्या हाती किती मोठा निधी तयार होईल, हे जाणून घेऊ आणि ही योजना कर-बचत आणि सुरक्षित पर्याय का आहे, हे देखील समजून घेण्याचा प्रयत्न करू.

सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारची एक बचत योजना आहे, जी खास मुलीसाठी सुरू करण्यात आली होती. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही मुलीच्या शिक्षण आणि लग्नाच्या खर्चासाठी निश्चित रक्कम तयार करू शकता.

२०२५ च्या तिमाहीसाठी (ऑक्टोबर–डिसेंबर) सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर ८.२% निश्चित करण्यात आला आहे. या दराने व्याज वार्षिक चक्रवाढ पद्धतीने (Annually Compound) मिळतं आणि प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी क्रेडिट केलं जातं.

समजा, तुम्ही मुलीच्या जन्मापासूनच दरवर्षी जास्तीत जास्त ₹ १,५०,००० जमा केले आणि ते १५ वर्षांपर्यंत केले असं समजू. नियमानुसार, १५ वर्षांपर्यंत रक्कम जमा करता येते आणि खातं २१ वर्षांनी मॅच्युअर होतं, म्हणजेच शेवटच्या ६ वर्षांत तुम्ही कोणताही नवीन पैसा जमा करत नाही, परंतु व्याज चालू राहते.

यानुसार एकूण जमा रक्कम (१५ वर्षे) = ₹ १,५०,००० × १५ वर्षे = ₹ २२,५०,०००. त्यावर मिळणारं व्याज (८.२% वार्षिक, चक्रवाढ पद्धतीने) = सुमारे ₹ ४९,३२,११९. यानंतर तुम्हाला मॅच्युरिटी मिळणारी एकूण रक्कम ₹ ७१,८२,११९ होऊ शकते.

म्हणजेच, १५ वर्षांत एकूण २२.५ लाख रुपये जमा करून २१ वर्षांनी तुमच्या मुलीला सुमारे ७१.८२ लाख रुपये मिळतील, जो शिक्षण किंवा लग्नासाठी पुरेसा मोठा निधी असू शकतो. सुकन्या समृद्धी योजनेत जमा केलेल्या रकमेवर कलम ८०सी (Section 80C) अंतर्गत कर कपात मिळते.

तसंच, या योजनेचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, व्याज पूर्णपणे कर-मुक्त राहते आणि मॅच्युरिटीची रक्कमही कर-मुक्त असते, ही स्कीम ईईई (Exempt-Exempt-Exempt) अंतर्गत येते. याव्यतिरिक्त, सुकन्या समृद्धी योजनेत किमान वार्षिक जमा ₹ २५० आहे आणि कमाल ₹ १.५ लाख (आर्थिक वर्ष) पर्यंत करता येते.

सरकारी हमी, कर-मुक्त परतावा आणि नियमांनुसार सुरक्षा यामुळे सुकन्या समृद्धी योजना आजही लॉक-इनसह सर्वात विश्वसनीय पर्याय आहे. पंतप्रधानांच्या म्हणण्यानुसार, SSY खात्यांची संख्या ४ कोटी पार झाली आहे आणि जमा केलेली रक्कम ३.२५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त पोहोचली आहे, जे दर्शवते की पालक या योजनेवर किती विश्वास ठेवतात.