Stock Market: अदानींनी सादर केले निकाल, शेअर बाजाराची मोठी झेप; सेन्सेक्समध्ये ६०० अंकांची उसळी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 05:00 PM2023-02-14T17:00:03+5:302023-02-14T17:09:12+5:30

आठवड्याच्या व्यवहाराच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली.

आठवड्याच्या व्यवहाराच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी एंटरप्रायझेसच्या (Adani Enterprises Q3 Results) तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर बाजारात तेजी आली आणि ही वाढ शेवटपर्यंत कायम राहिली.

व्यवहाराअंती मुंबई शेअर बाजाराचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 600 अंकांनी उसळी घेऊन 61,032.26 च्या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 159 अंकांच्या वाढीसह 17,929.85 च्या पातळीवर बंद झाला.

तत्पूर्वी, जागतिक बाजारातील वाढीमुळे देशांतर्गत शेअर बाजारही जोरदार उसळी पाहायला मिळाली. सेन्सेक्सने सुमारे 200 अंकांच्या वाढीसह 60,600 च्या पातळीवर व्यवहार सुरू केला.

तर दुसरीकडे निफ्टीही 4 अंकांची किंचित वाढ घेत 17,800 च्या पातळीवर उघडला. शेअर बाजारातील या मजबूत तेजीमागे गौतम अदानी यांची कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे तिसऱ्या तिमाहीचे निकालही मानले जाऊ शकतात.

खरं तर, अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या भोवऱ्यात अडकलेल्या गौतम अदानी यांच्या कंपनी अदानी एंटरप्रायजेस लिमिटेडने मंगळवारी चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. या कालावधीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 820 कोटी रुपये झाला आहे.

डिसेंबर तिमाहीत कंपनीने चमकदार कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत अदानी एंटरप्रायझेसला 11.63 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. पण या वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत अदानी एंटरप्रायझेसने मजबूत नफा नोंदवला आहे.

तिमाहीचा अहवाल समोर येताच अदानी एंटरप्रायजेसच्या शेअरमध्येही तुफान तेजी पाहायला मिळत आहे. हिंडनबर्गच्या अहवालानंतर एकाच दिवसात अदानी इंटरप्रायजेसचे शेअर्स 35 टक्क्यांहून अधिक कोसळले होते. आजची परिस्थिती पाहिली तर अदानी एंटरप्रायजेसचे शेअर 4 टक्क्यांनी वाढले आहेत.

डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीची कंसोलिडेटेड मिळकत वार्षिक आधारावर वाढून 26,612 कोटी रुपये राहिली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीशी तुलना केली असता कंपनीची मिळकत 18,758 कोटी रुपये इतकी होती. डिसेंबरच्या तिमाहीत अदानी एंटरप्रायजेसच्या नफ्याच्या टक्केवारीतही सुधार पाहायला मिळाला आहे. वार्षिक पातळीवरील नफ्याचं 4.1 टक्क्याचं प्रमाण आता 6.1 टक्क्यांवर पोहोचलं आहे. 

डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीचा खर्च देखील वाढला आहे. यावेळीच्या तिमाहीत 26,171 कोटी खर्च झाले आहेत. तर गेल्या वर्षी डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीचे 19,047.7 कोटी रुपये खर्च झाले होते.