मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुरू करा 'हे' खातं; 'या' स्कीममध्ये गुंतवणूकीवर मिळतील ६४ लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 10:09 AM2023-07-14T10:09:01+5:302023-07-14T10:21:01+5:30

तुम्ही यात केलेली छोटी गुंतवणूकही दीर्घ काळात मोठा फंड तयार करुन देऊ शकते.

आजकाल मुलांच्या शिक्षणावर आणि लग्नकार्यावर खूप खर्च होतो. अनेक पालकांना पैशांअभावी आपल्या मुलांना चांगलं उच्च शिक्षण देता येता येत नाही. परंतु मुलांच्या जन्मानंतर लगेचच त्यांच्यासाठी पैसे वाचवणं सुरू करणं हाच उत्तम उपाय आहे.

मुलींच्या भविष्याचा विचार करत केंद्र सरकारनं त्यांच्यासाठी एक उत्तम योजना सुरू केली आहे. सुकन्या समृद्धी योजना असे तिचे नाव आहे. ही योजना खूप लोकप्रिय आहे. या योजनेत तुम्ही तुमच्या मुलीचं खातं उघडू शकता. तुम्ही या खात्यात छोटी गुंतवणूक करू शकता, जी दीर्घकाळात मोठा फंड म्हणून तयार होईल.

सुकन्या समृद्धी योजना ही एक स्मॉल सेव्हिंग स्कीम आहे. सरकार दर तीन महिन्यांनी या योजनांसाठी व्याजदर निश्चित करते. जुलै ते सप्टेंबर २०२३ या तिमाहीसाठी, सरकारनं सुकन्या समृद्धी योजनेच्या (SSY Interest Rates) व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. यावेळी तुम्हाला या योजनेवर वार्षिक ८ टक्के दरानं व्याज मिळेल.

मुलीचा जन्म होताच हे खातं उघडून तिच्या नावे गुंतवणूक करणं फायद्याचं ठरू शकतं. तुम्ही मुलीच्या १० व्या वर्षापर्यंत हे खातं सुरू करू शकता. एखाद्या गुंतवणूकदारानं आपल्या मुलीच्या जन्मानंतर लगेचच या योजनेत खातं उघडल्यास, ती व्यक्ती १५ वर्षांसाठी त्यांचं योगदान जमा करू शकते. मुलगी १८ वर्षांची झाल्यावर मॅच्युरिटी रकमेच्या ५० टक्के रक्कम काढता येते. मुलगी २१ वर्षांची झाल्यावर उर्वरित रक्कम काढता येईल.

सुकन्या समृद्धी योजना तुमच्या मुलीला श्रीमंत बनवू शकते. तुम्ही सुकन्या समृद्धी खात्यात दरमहा १२,५०० रुपये जमा केले तर एका वर्षात ही रक्कम १.५ लाख रुपये होईल. या रकमेवर कोणताही कर लागणार नाही.

जर आपल्याला मॅच्युरिटीवर ७.६ टक्के व्याज मिळालं असं समजलो तर त्या गुंतवणूकदाराचा मॅच्युरिटीपर्यंत आपल्या मुलीसाठी मोठा फंड तयार करेल. जर गुंतवणूकदारानं मुलगी २१ वर्षांची झाल्यावर संपूर्ण रक्कम काढली, तर मॅच्युरिटी रक्कम ६३ लाख ७९ हजार ६३९ रुपये होईल.

तुमची या योजनेत गुंतवलेली रक्कम २२,५०,००० रुपये असेल. तर व्याजाचे उत्पन्न ४१,२९,६३४ रुपये असेल. अशाप्रकारे, तुम्ही सुकन्या समृद्धी खात्यात दरमहा १२,५०० रुपये जमा केल्यास, मुलगी २१ वर्षांची झाल्यावर तिला सुमारे ६४ लाख रुपये मिळतील.

सुकन्या समृद्धी योजनेत वर्षभरात १.६५० लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर आयकर सवलतीचा लाभही उपलब्ध आहे. या योजनेत एका वर्षात जास्तीत जास्त १.५ लाख रुपये जमा करता येतील.

सुकन्या समृद्धी योजना EEE दर्जासह येते. म्हणजेच तीन ठिकाणी करसवलत मिळते. सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवलेल्या रकमेवर कर सवलत उपलब्ध आहे. या योजनेतून मिळणारे व्याजही करमुक्त आहे. याशिवाय या योजनेत मॅच्युरिटी रक्कमही करमुक्त आहे.