Silicon Valley Bank : सिलिकॉन व्हॅली बँक बुडाली, भारतीय बँकिंग क्षेत्रावर किती परिणाम होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 11:15 AM2023-03-13T11:15:57+5:302023-03-13T11:25:48+5:30

सिलिकॉन व्हॅली बँक (SVB) बुडाल्यानंतर आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सिलिकॉन व्हॅली बँक (SVB) बुडाल्यानंतर आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याचा भारतीय बँकिंग व्यवस्थेवरही मोठा परिणाम होईल का? असा प्रश्नही अनेकांच्या मनात आहे. SVB बुडल्याने भारतातील बँकिंग क्षेत्रावर फारसा परिणाम होणार नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

एसबीआयचे माजी अध्यक्ष रजनीश कुमार यांनी याबाबत मनीकंट्रोलला माहिती दिली. याचा आपल्या देशातील बँकिंग उद्योगावर फारसा परिणाम होणार नाही. यूएस मध्ये, फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशननं (FDIC) १० मार्च रोजी सांगितलं की नियामकांनी सिलिकॉन व्हॅली बँक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच त्यांची मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे.

vकॅलिफोर्निया डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल प्रोटेक्शन अँड इनोव्हेशननं सिलिकॉन व्हॅली बँकेची क्लोजर ऑर्डर जारी केली आहे. तसंच रिसीव्हर म्हणून FDIC चे नाव दिलंय.

"आपल्या बँकिंग क्षेत्रावर याचा परिणाम होण्याची शक्यता नाही. कारण आपली बँकिंग प्रणाली खूप मोठी आहे आणि त्यात असे एक्सपोजर नाही. येथे समस्या आहे की ठेवी स्टार्टअप्सकडून आल्या आणि कमी झाल्यामुळे, बँकेला आपले सिक्युरिटीज विकावे लागले, ज्यामुळे तिचं मूल्य कमी झालं. आपल्याकडे अशी परिस्थिती नाही,” अशी प्रतिक्रिया बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस यांनी दिली.

सिलिकॉन व्हॅली बँक ही इतकी छोटी बँक आहे की तिच्या बुडण्यानं यूएस बँकिंग क्षेत्रावर फारसा परिणाम होणार नाही. नियामक या प्रकरणाची चौकशी करत असल्याचंही ते म्हणाले.

जोपर्यंत भारतीय बँकिंग क्षेत्राचा संबंध आहे, तिथे एसव्हीबी बुडण्याचा काही परिणाम होणार नाही. लेंडिंग रेशोच्या बाबतीत भारतीय बँका सुस्थितीत आहेत. इक्विटी मार्केटबद्दल सांगायचं झालं, तर याचा किरकोळ परिणाम दिसून येऊ शकतो, अशी प्रतिक्रिया स्टेकहोल्‍डर इम्पावरमेंट सर्व्हिसेसचे जे एन गुप्ता यांनी दिली.

जगात काही मोठी घटना घडली तर त्याचा परिणाम सर्व बाजारांवर होतो, असे गुप्ता म्हणाले. नाव न सांगण्याच्या अटीवर एका ब्रोकरनं सांगितलं की इन्व्हेस्टर्स मार्केटला जवळून पाहण्याचे प्रयत्न करत आहेत.

गुंतवणूकदार जागतिक बँकिंग क्षेत्रावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आम्हाला विश्वास आहे की भारतावर कोणताही मोठा परिणाम होणार नाही. पण गुंतवणूकदार सावधगिरी बाळगत असल्याचंही त्यांनी सांगितलं.