घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 17:19 IST2025-08-16T16:59:52+5:302025-08-16T17:19:41+5:30

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) होम लोनवरील व्याज दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे...

घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्या लोकांच्या स्वप्नांना देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने झटका दिला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) होम लोनवरील व्याज दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

बँकेने व्याजदरांच्या वरच्या बँडमध्ये (Upper Band) 25 बेसिस प्वाइंटची वाढ केली आहे. आधी SBI च्या गृह कर्जावरील व्याज ७.५०% ते ८.४५% दरम्यान होते, ते आता ७.५०% ते ८.७०% दरम्यान झाले आहे. अर्थात, किमान मर्यादा जशाच तशी ठेवली असून, कमाल मर्यादा वाढवण्यात आली आहे.

महत्वाचे म्हणजे, जुलै महिन्यातही एसबीआयचा व्याजदर 7.50% ते 8.45% होता. या नव्या बदलामुळे आता नव्या ग्राहकांना 7.50% ते 8.70% पर्यंत व्याज द्यावे लागेल.

घर घरेदी करणाऱ्यांना झटका - जुलै अखेर युनियन बँक ऑफ इंडियानेही व्याजदर वाढून 7.35% ते 7.45% केला होता. तसेच खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय 8%, एचडीएफसी 7.90% आणि अॅक्सिस बँक 8.35% अशा किमान व्याजदराने गृहकर्ज देत आहे.

महत्वाचे म्हणजे, आरबीआय सातत्याने रेपो रेट कमी करत, जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न करत असतानाच, एसबीआयकडून ही वाढ करण्यात आली आहे. बँकेच्या या निर्णयाचा फटका प्रामुख्याने ज्यांचा क्रेडिट स्कोर कमी आहे, अशा ग्राहकांना बसेल, कारण कमाल व्याजदराची सीमा वाढवण्यात आली आहे.

केवळ नव्या ग्राहकांना लागू - एसबीआय नंतर, इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकाही लवकरच असा निर्णय घेऊ शकतात, असे मानले जात आहे. ईटीच्या वृत्तानुसार, हा बदल सध्या केळव नवीन गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांनाच लागू असेल.

महत्वाचे म्हणजे, टॅरीफमुळे निर्माण झालेल्या जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, भारताच्या जीडीपीला गती देण्यासाठी आरबीआय एकूण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. यामुळेच, जनतेला दिलासा देण्यासाठी आरबीआयने रेपो दरात सलग तीन वेळा कपात केली आहे.

खरे तर, रेपो दरातील कपातीमुळे जनतेला अप्रत्यक्ष फायदा होत असतो, कारण यानंतर बँका गृहकर्जांसह सर्व प्रकारच्या कर्जांवरील व्याजदर कमी करत असतात.