Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 09:22 AM2024-05-10T09:22:32+5:302024-05-10T09:34:41+5:30

Sanjiv Goenka Net Worth: हैदराबादनं लखनौ सुपर जायंट्सवर १० गडी राखून मात केली. सामना संपल्यानंतर लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोएंका रागाच्या भरात मैदानात उतरल्याचे दिसले.

आयपीएल २०२४ च्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं (Sunrisers Hyderabad) लखनौ सुपर जायंट्सवर (Lucknow Super Giants ) १० गडी राखून मात केली. हैदराबादच्या या विजयानंतर मैदानावर एक किस्साही पाहायला मिळाला. सामना संपल्यानंतर लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोएंका रागाच्या भरात मैदानात उतरले. त्यांनी संघाचा कर्णधार केएल राहुल आणि प्रशिक्षक गॅरी स्टेडमन यांच्याशी संवाद साधला.

बुधवारी सनरायझर्स हैदराबादने आपल्या घरच्या मैदानावर लखनौ सुपर जायंट्सचा दारूण पराभव केला. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर यजमान हैदराबादने १० गडी राखून विजय साकारला. पाहुण्या लखनौनं दिलेल्या १६६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सलामी जोडी पाहुण्यांना भारी पडली.

अवघ्या ९.४ षटकांत लक्ष्य गाठून पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील संघाने मोठा विजय मिळवला. खरे तर आयपीएलमध्ये १०० हून अधिक धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सर्वात कमी षटकांत आव्हान गाठणारा हैदराबाद हा पहिला संघ ठरला आहे.

गोएंका संघाच्या खराब कामगिरीवर प्रचंड नाराज होते. त्यांनी खेळाडूंना जोरदार फटकारलं. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. लोक सर्व प्रकारचे अंदाज लावत आहेत. काहींच्या म्हणण्यानुसार गोएंका इतके संतापले होते की त्यांनी राहुलला कर्णधारपदावरून हटवण्याची धमकीही दिली होती. तर काहींचे म्हणणं आहे की, गोएंका यांनी संघाच्या कामगिरीत सुधारणा न झाल्यास दंड आकारण्याची भाषा केली आहे. केएल राहुलवर नाराज असलेलं संजीव गोएंका कोण आहेत, ते कोणता व्यवसाय करतात आणि त्यांची नेटवर्थ किती आहे हे जाणून घेऊया.

आरपीएसजी ग्रुपचे प्रमुख डॉ. संजीव गोएंका हे देशातील प्रसिद्ध उद्योजक आहेत. तो लखनौ सुपर जायंट्सचे ते मालकही आहेत. गोएंका यांचा जन्म २९ जानेवारी १९६१ रोजी कोलकाता येथे झाला. आरपीजी एंटरप्राइझची स्थापना त्यांचे वडील रामप्रसाद गोएंका यांनी केली होती. संजीव गोएंका हे आयआयटी खरगपूरचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांचे भाऊ हर्ष गोएंका यांच्या नेतृत्वाखालील आरपीजी ग्रुप वेगळा झाल्यानंतर संजीव गोएंका यांनी आरपीएसजी ग्रुपची धुरा सांभाळली.

एनर्जी, रिटेल, मीडिया-एंटरटेनमेंट, एफएमसीजी, इन्फ्रास्ट्रक्चर आणि शिक्षण अशा विविध उद्योगांमध्ये हा समूह कार्यरत आहे. संजीव गोएंका यांनी २०११ मध्ये आरपीएसजी ग्रुप या आंतरराष्ट्रीय समूहाची स्थापना केली. कलकत्ता इलेक्ट्रिक सप्लाय कॉर्पोरेशन (सीईएससी) आरपीएसजी समूहाचा फ्लॅगशिप उपक्रम म्हणून कार्यरत आहे. संजीव गोएंका यांची एकूण संपत्ती सुमारे २.१ अब्ज डॉलर म्हणजेच १६,५०० कोटी रुपये आहे. ते भारतातील ८३ व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.

संजीव गोएंका यांच्या नेतृत्वाखालील आरपीएसजी समूहानं २०२१ मध्ये लखनौ सुपरजायंट्स फ्रेन्चायझी ७,०९० कोटी रुपयांना विकत घेतली. एलएसजी ही नवी फ्रेन्चायझी आहे. लखनौ सुपरजायंट्स २०२३ पर्यंत आयपीएलमधील चौथ्या क्रमांकाचा सर्वात महागडा संघ ठरला.