मुंबईच्या फूटपाथवर पुस्तके विकली; आज दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीय, कोण आहेत रिझवान साजन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 14:53 IST2025-06-26T14:47:13+5:302025-06-26T14:53:07+5:30

Rizwan Sajan: मुंबईतील झोपडपट्टी परिसरात जन्म; फूटपाथवर पुस्तके विकणारे रिझवान साजन आता दररोज करतात ३२ कोटींची कमाई..!

Rizwan Sajan: संयुक्त अरब अमिराती(UAE) मधील दुबई शहर जगभर खूप प्रसिद्ध आहे. येथील लक्झरी लाइफस्टाईल आणि गगनचुंबी इमारती पर्यटकांमध्ये आकर्षणाचे केंद्र आहे. भारतासह जगभरातील अनेक लोक येथे स्थायिक झाले आहे.

स्थायिक होण्यासोबतच त्यांनी येथील मालमत्तांमध्ये प्रचंड गुंतवणूक केली आहे. त्यामुळे आजच्या काळात दुबई हे मालमत्ता खरेदी करण्याच्या बाबतीत जगातील सर्वात लोकप्रिय ठिकाण बनले आहे. आज आम्ही तुम्हाला एका अशा भारतीय व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, ज्याने मुंबईच्या झोपडपट्टीपासून ते दुबईतील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याचा प्रवास केला आहे.

दररोज ३२ कोटींची कमाई- आपल्या देशात अशा यशस्वी व्यावसायिकांची कमतरता नाही, ज्यांनी आपल्या कठोर परिश्रम, समर्पण आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर अपार यश मिळवले आहे. त्यापैकी एक रिजवान साजन आहेत. कधीकाळी मुंबईतील फूटपाथवर पुस्तके विकणारे रिजवान डॅन्यूब ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष आहे. आज या ग्रुपच्या यूएई, ओमान, कतार, सौदी अरेबिया, भारत अशा अनेक देशांमध्ये शाखा आहेत. डॅन्यूब ग्रुपचा रियल एस्टेट आणि होम डेकॉरचा व्यवसाय आहे. याद्वारे रिझवान साजन दररोज ३२ कोटी रुपयांची कमाई करतात.

बालपण झोपडपट्टीत गेले- मुंबईतील घाटकोपर भागातील झोपडपट्टीत जन्मलेल्या रिझवान यांचे बालपण खूप कष्टात गेले. फोर्ब्सला दिलेल्या मुलाखतीत रिझवान यांनी सांगितले होते की, एकदा त्याच्या वडिलांना लॉटरी लागली, त्यानंतर त्यांचे कुटुंब झोपडपट्टीतून एका छोट्या घरात स्थलांतरित झाले.

रिझवान यांची शाळा घरापासून खूप लांब होती, ऑटो किंवा बसचे पैसे परवडत नव्हते, त्यामुळे बालपणी ते बहिणीसोबत लांब अंतर चालत शाळेत जायचे. आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी वडिलांकडून १००० रुपये उधार घेतले आणि काही पुस्तके खरेदी करुन विकली.

पुस्तकासोबतच त्यांनी राखी विकण्यापासून ते फटाके आणि दूध विकण्यापर्यंत विविध कामे केली. ते १६ वर्षांचे असताना वडिलांचे निधन झाले. दोन वर्षांनंतर, १९८१ मध्ये त्यांना कुवेतमध्ये काम करण्याची ऑफर मिळाली. ते तिथे ट्रेनी सेल्समन म्हणून काम करत होते. काही वर्षांनंतर १९९३ मध्ये त्यांनी डॅन्यूब ग्रुपची स्थापना केली.

आज प्रचंड संपत्तीचे मालक - गेल्या काही वर्षांत डॅन्यूब ग्रुपचा व्यवसाय भरभराटीला आला आहे. आज कंपनीचे वार्षिक उत्पन्न १० अब्ज दिरहम आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिझवान दररोज ३२ कोटी रुपये कमवतात. त्यांची अंदाजे निव्वळ संपत्ती $२.५ अब्ज आहे, ज्यामुळे ते दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीय बनले आहेत.

एकदा एका मुलाखतीत रिझवान म्हणाले होते, "मला स्वतःवर इतका विश्वास आहे की, माझी संपत्ती गेली, तरीदेखील मी शुन्यातून माझा व्यवसाय पुन्हा उभारू शकतो. मी असा व्यक्ती आहे, जो आफ्रिकेच्या जंगलातही पैसे कमवू शकतो. तुम्ही फक्त नशिबावर अवलंबून राहून यशस्वी होऊ शकत नाही. यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील."