TATA, Adani, RIL नाही, ‘ही’ कंपनी देते सर्वाधिक रोजगार; टर्नओव्हर पाहून व्हाल अवाक्, पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 03:39 PM2021-11-20T15:39:25+5:302021-11-20T15:43:24+5:30

टाटा, रिलायन्स आणि अदानी ग्रुपपेक्षाही कितीतरी जास्त रोजगार देणारी ही कंपनी कोणती? किती आहे टर्नओव्हर? जाणून घ्या...

कोरोना संकटानंतर देशातील विविध क्षेत्रातील अनेकविध कंपन्या नवनवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहेत. आताच्या घडीला देशात अशी एक कंपनी आहे जी TATA ग्रुप, Adani ग्रुप आणि रिलायन्स पेक्षाही अधिक रोजगार देत आहे.

ती कंपनी दुसरी कोणतीही नसून Amul आहे. गुजरातमधील आनंद येथे असलेल्या अमूल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सोढी यांच्यानुसार, अमूल रोजगार उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत देशातील बड्या कॉर्पोरेट कंपन्यांपेक्षा पुढे आहे.

दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, अदानी ग्रुप सुमारे २ लाख लोकांना रोजगार देते. तर रिलायन्स तीन ते चार लाख लोकांना रोजगार देते. यांपेक्षा पुढे असणारा टाटा समूह आठ लाख लोकांना रोजगार देत आहे. तर अमूलमुळे तब्बल १५ लाख लोकांना रोजगार उपलब्ध होतो.

इतकेच नव्हे तर Amul तब्बल ३५ लाख शेतकऱ्यांकडून दररोज सुमारे २.५० कोटी लीटर दूध घेते. आम्ही छोट्या शेतकऱ्यांना बाजाराशी जोडण्याचा प्रयत्न करत आहोत. शेतकऱ्यांना त्यांच्या श्रमाचा, मेहनतीचा चांगला भाव मिळावा, हाच यामागचा उद्देश आहे.

गेल्या ७५ वर्षांपासून आम्ही याच उद्देशाने काम करत आहोत, असे सोढी यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, Amul कंपनी आपल्या कमाईतील ८० टक्के भाग हा शेतकऱ्यांना देते. विशेष म्हणजे अमूल कंपनीची उत्पादने रेल्वेपासून ते अगदी विमान कंपन्यांही विकत घेतात.

एका सर्वेक्षणानुसार, आताच्या घडीला भारतातील प्रत्येक तिसरी व्यक्ती Amul उत्पादनांचे सेवन करते. देशातील १७ राज्यांमध्ये तब्बल १०० कोटी नागरिक अमूलची उत्पादने वापरतात असेही म्हटले जाते.

Amul कंपनीने सध्या तेल, आटा, बटाट्यापासून निर्मित स्नॅक्स, मिल्क बेस्ड कॉर्बोनेटर सेल्टझर, मध आणि फ्रोझन फूड या क्षेत्रातही पाऊल ठेवले असून, एका मोठ्या योजनेवर काम करत आहे. अमूल कंपनी आइस्क्रीम आणि आपल्या डेअरी प्रॉडक्ट्ससाठी फ्रेंचायझीही देते.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २० वर्षांमध्ये Amul कंपनीच्या टर्नओव्हरमध्ये तब्बल १५८० टक्क्यांची वाढ झाली आहे. सन २००१-२००२ या कालावधीत अमूल कंपनीचा टर्नओव्हर २२ हजार ३३६ कोटी एवढा होता.

तर सन २०२०-२०२१ या वर्षांत Amul कंपनीचा टर्नओव्हर तब्बल ३९ हजार २४८ कोटी रुपयांवर गेला आहे. यानुसार, गेल्या २५ वर्षांत सहकारी कंपन्या मिळून अमूल कंपनीच्या टर्नओव्हरमध्ये ३ हजार ४२३ टक्क्यांची वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.