अमेरिकेचा भारतीय बाजाराला झटका, 'हे' पाच शेअर्स सर्वाधिक कोसळले; गुंतवणूकदार लुटले!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 11:15 AM2022-06-13T11:15:39+5:302022-06-13T11:33:57+5:30

विक्रमी महागाई अमेरिकेत शेअर बाजार पडला होता. त्याचाच परिणाम आज भारतीय शेअर बाजारात दिसून आला.

भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली आहे. जागतिक शेअर बाजारात झालेल्या पडझडीचे पडसाद भारतीय शेअर बाजारावरही दिसून आले.

आज प्री ओपनिंगमध्ये सेन्सेक्स निर्देशांक १४०० अंकांनी कोसळला. तर, निफ्टीत ४१३ अंकांची घसरण दिसून आली.

वाढत्या महागाईचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. अमेरिकेत विक्रमी महागाई नोंदवण्यात आल्यानंतर शुक्रवारी अमेरिकन शेअर बाजारात पडझड झाली होती. त्याशिवाय, आज SGX NIFTY मध्ये व्यवहाराची सुरुवात गॅप डाऊनने झाली. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला.

राष्ट्रीय शेअर बाजार आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात, नंदनी क्रिएशन लिमिटेडचा शेअर सर्वात जास्त घसरला आहे. सुरुवातीच्या व्यापारात तो १६ टक्क्यांहून अधिक तोट्यात आहे.

RBL बँकेचा १५ टक्क्यांपर्यंत शेअर घसरला आहे. V2 रिटेलचा शेअर १० टक्क्यांपेक्षा थोडा जास्त तोट्यात व्यवहार करत आहे. पोद्दार हाऊसिंग आणि पर्ल पॉलिमर्स लिमिटेडचा शेअर ९.५० टक्क्यांपर्यंत घसरला आहे.

दरम्यान, शुक्रवारी भारतीय शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला होता. सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह लाल रंगात बंद झाले होते.

सेन्सेक्स -१०१६.८४ अंकांनी म्हणजेच -१.८४ टक्क्यांनी घसरला होता आणि हा निर्देशांक ५४,३०३.४४ च्या पातळीवर बंद झाला होता. याशिवाय निफ्टी -२७६.३० अंकांनी म्हणजेच -१.६८ टक्क्यांनी कमी झाला होता आणि हा निर्देशांक १६२०१.८० वर बंद झाला होता.