Ratan Tata: रतन टाटांच्या खांद्यावर हात ठेवणाऱ्या तरुणाची लॉटरी; स्टार्टअपमध्ये टाटांनी केली मोठी गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 07:21 PM2022-08-16T19:21:14+5:302022-08-16T19:34:24+5:30

रतन टाटांच्या खांद्यावर ठेवल्यामुळे प्रकाश झोतात आलेल्या शंतनू नायडूसाठी रतन टाटा पुढे सरसावले आहेत.

उद्योग क्षेत्रातील दिग्गज रतन टाटा विविध स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करत असतात. त्यांच्या मदतीमुळे अनेक स्टार्टअप्सना मोठा आधार मिळतो. आता रतन टाटा यांनी एका 25 वर्षीय तरुणाच्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीनंतर अनेकांना उत्सुकला लागली आहे की, हा तरुण कोण आहे आणि याची कंपनी नेमकं काय काम करते..?

मिळालेल्या माहितीनुसार, रतन टाटा यांनी 'गुडफेलोज' या स्टार्टअपमध्ये गुंतवणुक करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी ज्येष्ठ नागरिकांना सेवा देण्याचे काम करते. अद्याप, गुंतवणुकीच्या रकमेबाबत माहिती देण्यात आलेली नाही. रतन टाटा यांनी टाटा समूहातून निवृत्ती घेतल्यापासून अनेक स्टार्टअप्समध्ये पैसे गुंतवले आहेत.

कंपनीचा संस्थापक कोण आहे: ज्या स्टार्टअपमध्ये रतन टाटा यांनी गुंतवणुकीची घोषणा केली आहे, त्याची स्थापना शंतनू नायडू यांनी केली आहे. कॉर्नेल विद्यापीठात शिकलेला 25 वर्षीय शंतनू टाटा यांच्या कार्यालयात असून, तो 2018 पासून टाटा यांना मदत करत आहेत.

काय स्टार्टअपची विशेषतः हे स्टार्टअप तरुण पदवीधरांना ज्येष्ठ नागरिकांचा साथीदार म्हणून नियुक्त करते. कंपनी गेल्या सहा महिन्यांपासून मुंबईतील बीटा टप्प्यात 20 वृद्धांसोबत काम करत आहे. येत्या काळात पुणे, चेन्नई आणि बंगळुरुमध्ये सेवांचा आणखी विस्तार करण्याची योजना आहे.

रतन टाटा काय म्हणाले: रतन टाटा यांनी या आगळ्या-वेगळ्या स्टार्टअप्सचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, जोपर्यंत तुम्ही म्हातारे होत नाही, तोपर्यंत तुम्हाला वृद्ध झाल्यासारखे वाटत नाही. चांगल्या स्वभावाचा जोडीदार शोधणे हेही एक आव्हान असल्याचेही ते म्हणाले.

स्टार्टअपचे प्रमुख नायडू यांनी रतन टाटा यांना एक चांगला बॉस, मार्गदर्शक आणि मित्र म्हटले. तसेच, जगात 5 कोटी वृद्ध लोक एकटे आहेत, त्यांना जोडीदाराची गरज आहे. आम्ही कंपनीचा देशभरात विस्तार करणार आहोत, परंतु गुणवत्तेशी तडजोड न करता संथ गतीने पुढे जाऊ, असे नायडू म्हणाले.