Public Provident Fund : पीपीएफमध्ये गुंतवणूक केल्यास मिळतील 'हे' विशेष फायदे; जाणून घ्या, सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 05:53 PM2021-12-07T17:53:56+5:302021-12-07T18:00:07+5:30

Public Provident Fund: पीपीएफमध्ये गुंतवणुकीचा कालावधी 15 वर्षांचा असतो. जर व्यक्तीची इच्छा असेल तर ती पाच वर्षांसाठी वाढवता येते.

नवी दिल्ली : सर्वांना आपल्या भविष्याची चिंता असते. त्यामुळे भविष्याचा विचार करून आपल्यापैकी बहुतेकजण बचत करतात, जेणेकरून भविष्य सुरक्षित बनवता येऊ शकेल. वृद्धापकाळात तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत राहिल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही.

अशा प्रकारे, तुम्ही 60 वर्षांनंतर तुमचे आयुष्य सहज जगू शकाल. हे लक्षात घेऊन भारतातील अनेक लोक सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक करतात. गुंतवणुकीसाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund) हा उत्तम पर्याय आहे.

यामध्ये गुंतवणूक केल्याने, तुम्हाला मॅच्युरिटी कालावधीनंतर खूप चांगला परतावा मिळतो, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे भावी आयुष्य सहजतेने जगू शकाल. पीपीएफमध्ये गुंतवणुकीचा कालावधी 15 वर्षांचा असतो. जर व्यक्तीची इच्छा असेल तर ती पाच वर्षांसाठी वाढवता येते. त्यामुळे या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीतील गुंतवणुकीत व्यक्तीला कोणते फायदे मिळतात ते जाणून घेऊया...

तुम्ही तुमचे पैसे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवल्यास, तुम्हाला विविध प्रकारचे कर लाभ मिळतात. आयकर कायदा 1961 च्या कलम 80C मध्ये नमूद केले आहे की, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवलेल्या रकमेवर 1.5 लाख रुपयांच्या कर कपातीचा लाभ मिळेल. गुंतवणूकदारांना सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी गुंतवणुकीवर मिळणारी रक्कम आणि परतावा या दोन्हींवर कर सूट मिळते.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवलेल्या पैशावर गुंतवणूकदाराला चांगला परतावा मिळतो. सध्या यामध्ये गुंतवणूक केल्यास व्यक्तीला 7.1 टक्के व्याज मिळत आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी गुंतवणुकीवरील व्याजदर दरवर्षी चक्रवाढ केले जाते.

जर तुम्ही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला त्यावर कर्जाचे फायदे देखील मिळतात. मात्र, तुम्ही खाते उघडल्याच्या तिसऱ्या ते सहाव्या वर्षापर्यंतच कर्ज घेऊ शकता. हे कर्ज तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी वापरू शकता.