Dream11, एमपीएल, झूपीसह अनेक कंपन्यांकडून 'रियल मनी गेम्स' बंद; तुमच्या पैशांचं काय होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 13:36 IST2025-08-22T13:30:41+5:302025-08-22T13:36:32+5:30
Real Money Games : भारतातील ऑनलाइन गेमिंग उद्योगात एक मोठा बदल होत आहे. सरकारने नुकताच 'ऑनलाइन गेमिंग बिल २०२५' संसदेत मंजूर केल्यानंतर, देशातील प्रमुख गेमिंग कंपन्यांनी त्यांच्या 'रियल मनी गेम्स' बंद करण्यास सुरुवात केली आहे.

ड्रीम११ ची पॅरेंट कंपनी ड्रीम स्पोर्ट्स, गेम्सक्राफ्ट, मोबाईल प्रीमियर लीग, झूपी आणि प्रोबो यांसारख्या कंपन्यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर पैशांवर आधारित असलेले खेळ थांबवले आहेत.
ड्रीम स्पोर्ट्स कंपनीने त्यांच्या नवीन ॲप्स ड्रीम पिक्स आणि ड्रीम प्ले वरील 'पे टू प्ले' स्पर्धा थांबवल्या आहेत. मात्र, खेळाडूंचे पैसे सुरक्षित असून ते कधीही ड्रीम११ ॲपमधून काढता येतील, असे कंपनीने सांगितले आहे. भविष्यात ड्रीम११ च्या मुख्य ॲपवरही ही बंदी लागू होण्याची शक्यता आहे.
एमपीएल एमपीएलने देखील सर्व पैसे लावून खेळले जाणारे गेम्स बंद केले आहेत. ज्या खेळाडूंच्या खात्यात बॅलन्स शिल्लक आहे, ते सहजपणे तो काढू शकतात. कंपनी आता फक्त 'फ्री टू प्ले' गेमिंगवर लक्ष केंद्रित करणार आहे.
गेम्सक्राफ्टने त्यांच्या रम्मी ॲप्सवर 'ॲड कॅश' आणि 'गेमप्ले' सेवा बंद केल्या आहेत. कंपनीने खेळाडूंचे पैसे सुरक्षित असल्याचे आणि ते कधीही काढता येतील असे स्पष्ट केले आहे.
झूपीने २१ ऑगस्टपासून त्यांचे 'पेड गेम्स' थांबवण्याची घोषणा केली आहे. मात्र, त्यांचे मोफत गेम्स, जसे की लुडो सुप्रीम आणि स्नेक्स अँड लॅडर्स, नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
प्रोबोने तात्काळ त्यांचे 'रियल मनी गेम्स' बंद केले आहेत. कंपनीने सरकारच्या निर्णयाचा आदर असल्याचे सांगत, भविष्यात 'इनोव्हेशन'वर लक्ष केंद्रित करण्याचे वचन दिले आहे.
संसदेने मंजूर केलेल्या या नवीन कायद्यानुसार, कोणताही असा खेळ ज्यामध्ये खेळाडू पैसे जमा करतो आणि जिंकण्याची अपेक्षा ठेवतो, तो आता बेकायदेशीर मानला जाईल. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा एक कोटी रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो.
मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार या बंदीमुळे, २.४ अब्ज डॉलर कमाई करणाऱ्या भारतीय 'रियल मनी गेम' उद्योगावर मोठा परिणाम होणार आहे. हा उद्योग भारताच्या एकूण गेमिंग क्षेत्राच्या (३.८ अब्ज डॉलर) कमाईचा एक मोठा भाग होता.