एकेकाळी ₹१५० साठी भांडी धुतली, आज डोसा किंग नावानं आहेत प्रसिद्ध; देश-विदेशात आहेत रेस्तराँ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 10:26 AM2023-09-14T10:26:19+5:302023-09-14T10:35:42+5:30

कोणतंही काम छोटं नसतं असं म्हणतात. पूर्ण मेहनत आणि झोकून देऊन काम केलं तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळू शकतं.

कोणतंही काम छोटं नसतं असं म्हणतात. पूर्ण मेहनत आणि झोकून देऊन काम केलं तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळू शकतं. आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच एका व्‍यक्‍तीबद्दल सांगणार आहोत, ज्याला एकेकाळी पैसे कमाण्‍यासाठी भांडी धुवायला लावली जात होती. पण आज तिच व्यक्ती देशातच नाही, तर परदेशातही प्रसिद्ध आहे.

आज ती व्यक्ती कोट्यधीश आहे. आम्ही सांगत आहोत प्रसिद्ध डोसा चेन 'डोसा प्लाझा' चे मालक प्रेम गणपति यांच्याबद्दल. एकेकाळी भांडी धुवून महिन्याला १५० रुपये कमावणाऱ्या प्रेम गणपति यांच्या डोसा प्लाझाची कमाई आज कोटींच्या घरात आहे. पण एक वेळ अशी आली होती की त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

प्रेम गणपति यांचा जन्म तामिळनाडूतील तुतीकोरीन जिल्ह्यातील नागलापुरम येथे एका गरीब कुटुंबात झाला. कुटुंब अत्यंत गरीब असल्यामुळे ते दहावीपर्यंतच शिकू शकले. कुटुंबात आई-वडिल आणि प्रेम यांच्यासह सात भाऊ-बहीण होते. आपल्या कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी मदत करण्यासाठी, प्रेम यांनी लहानपणापासूनच चेन्नईमध्ये लहान-मोठ्या नोकऱ्या करायला सुरुवात केली, ज्यामुळे त्याला महिन्याला काही पैसे मिळायचे. हे पैसे ते त्याच्या घरी पाठवत असत.

त्यानंतर प्रेम आपल्या मित्रासोबत मुंबईला आले. मित्रानं त्यांना १२०० रुपयांची नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र तोच मित्र त्यांची फसवणूक करून वांद्रे रेल्वे स्थानकावर सोडून पळून गेला. इथे ते कोणालाच ओळखत नव्हते आणि भाषेचीही अडचण होती. नाईलाजास्तव त्यांना एका ढाब्यावर काम करावं लागलं.

प्रेम गणपति यांनी माहीममधील एका छोट्या बेकरीमध्ये १५० रुपये प्रति महिना पगारावर भांडी धुण्याचं कामही केलं. पैसे वाचवण्यासाठी ते रात्री एका छोट्या हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करू लागले. त्यांना डोसा बनवण्याची आवड होती आणि यामुळे मालकही त्यांच्यावर खूश होते.

१९९२ पर्यंत त्यांनी आपला छोटा व्यवसाय सुरू करण्याइतके पैसे जमा केले होते. त्यांनी इडली आणि डोसा विकण्याचं काम सुरू केलं. त्यांनी १५० रुपयांना एक गाडी भाड्यानं घेतली आणि १००० रुपयांत इतर सामान घेतलं. यानंतर त्यांनी आपल्या दोन भावांनाही सोबत घेतलं.

१९९७ मध्ये प्रेम गणपति आणि त्यांच्या भावांनी ५० हजार रुपये जमा करून वाशी परिसरात एक छोटी जागा भाडेतत्त्वावर घेतली आणि त्याला प्रेमसागर डोसा प्लाझा असं नाव दिलं. २००२ पर्यंत, या ठिकाणी १०५ प्रकारचे डोसे मिळू लागले. त्यांचं हे आऊटलेट लोकप्रिय झालं.

२००८ मध्ये, डोसा प्लाझानं आशियातील सर्वात मोठ्या मॉलमध्ये प्रवेश केला. त्याच वर्षी डोसा प्लाझानं न्यूझीलंडमध्ये आउटलेट उघडून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश केला. तोपर्यंत त्यांचे भारतात ३५ आउटलेट होते. आज प्रेम गणपति देशातच नाही, तर परदेशातही प्रसिद्ध आहेत.