Old Cars on Loan : जुन्या गाड्यांवर 'या' बँका देत आहेत स्वस्त लोन; पाहा पूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 02:39 PM2021-05-04T14:39:52+5:302021-05-04T14:48:29+5:30

Old Cars : अनेकदा शिकण्यासाठी किंवा बजेटमुळे आपला कल सेकंड हँड कार्सकडेही असतो.

अनेकांना कारचं आकर्षण असतं. अनेकदा आपण नवी कार घेण्यापूर्वी शिकण्याकरिता किंवा नवी कार आपल्या बजेटच्या बाहेर असल्यास सेकंड हँड म्हणजेच जुन्या कारचा विचार करत असतो.

जुन्या कारवरही आपल्याला लोन घेता येतं आणि अशा काही बँका आहेत ज्या जुन्या कारवरदेखील कमी व्याजदरात लोन उपलब्ध करून देतात.

सरकारी बँकांमध्ये लोन मिलतं परंतु ते सध्याच्या ग्राहकांनाच दिलं जातं. परंतु काही खासगी बँका डिलर्सच्या मदतीनं ग्राहकांना लोन उपलब्ध करून देतात.

सध्या कॅनरा बँक जुन्या गाड्यांवर ७.३० ते ९.९० टक्के व्याज दरानं ५ वर्षांकरिता कर्ज देते. यासाठी लोन अमाऊंटच्या ०.२५ टक्के (१ हजार ते ५ हजार) प्रोसेसिंग शुल्क म्हणून आकारले जाते.

बँक ऑफ इंडिया ७.४५ ते ८.५५ टक्क्यांनी आपल्या ग्राहकांना ३ वर्षांसाठी लोन देते. यासाठी ग्राहकांना १ टक्का प्रोसेसिंग शुल्क द्यावं लागतं.

युनिअन बँक ऑफ इंडियादेखील जुन्या कार्ससाठी लोन देते. बँक ८.९० टक्के ते १०.५० टक्के व्याजदरानं ५ वर्षांसाठी लोन देते. यासाठी ग्राहकांकडून १ हजार रूपये प्रोसेसिंग शुल्क आकारलं जातं.

साऊथ इंडियन बँक ग्राहकांना १ टक्के प्रोसेसिंग चार्जसह १३.३० ते १३.७५ टक्के व्याजदरानं जुन्या कारसाठी कर्ज देते.

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांना ९.५०-१०.५० टक्क्यांनी ग्राहकांना लोन देते. तसंच लोन अमाऊंटच्या ०.५० टक्के प्रोसेसिंग शुल्क आकारलं जातं. बँक हे कर्ज ५ वर्षांसाठी देते.

HDFC बँक १३.७५ ते १६ टक्के व्याज दरानं ग्राहकांना जुन्या गाड्यांसाठी कर्ज उपलब्ध करून देते. यामध्ये १ टक्के प्रोसेसिंग शुल्क आकारलं जातं. तसंच बँक सात वर्षांच्या कालावधीसाठीही लोन देते.

फेडरल बँक ग्राहकांना ५ वर्षांसाठी १३.८० टक्के व्याज दरानं जुन्या गाड्यांसाठी लोन देते. बँक ५ वर्षांसाठी हे लोन देत असून त्यासाठी १५०० ते २५०० रूपये प्रोसेसिंग शुल्क आकारते.

Axis Bank आपल्या ग्राहकांना जुन्या गाड्यांसाठी १४.४५ ते १६.४५ टक्के व्याजदरानं ५ वर्षांसाठी लोन उपलब्ध करून देते. तसंच यासाठी लोन अमाऊंटच्या १ टक्के प्रोसेसिंग शुल्क आकारलं जातं.

जेव्हा आपण जुन्या कारसाठई कर्ज घेण्यासाठी जातो त्यावेळी लोन टू रेश्यो व्हॅल्यू ही महत्त्वाची असते. त्यावर तुम्हाला किती कर्ज दिलं जाईल हे अवलंबून असतं.

यावरच तुमचा कालावधीही अवलंबून असतो. याशिवाय बँक कमी व्याजदरात तुम्हाला कर्ज उपलब्ध करून देत असेल तर लोन टू रेश्यो व्हॅल्यू कमी असल्यास तुम्हाला अधिक रक्कम मिळणार नाही.

समजा तुम्हाला जुन्या कारसाठी ५ लाख रुपयांचे कर्ज हवे आहे, परंतु जर तुमची लोन रेशो व्हॅल्यू ६० टक्के असेल तर तुम्हाला फक्त ३ लाख रुपयांचे कर्ज मिळेल.

जुन्या कार्ससाठी कर्ज देणे ही बँकांसाठी नेहमीच जोखमीचं ठरत असतं. बँका थर्ट पार्टी क्विलिटी चेकवर विश्वास ठेवत नाहीत.