NSC vs FD vs Lumpsum: ५ वर्षांसाठी ₹१,००,००० कुठे गुंतवू शकता, कोणती स्कीम करू शकते मालामाल?

By जयदीप दाभोळकर | Updated: March 27, 2025 09:25 IST2025-03-27T09:08:53+5:302025-03-27T09:25:44+5:30

NSC vs FD vs Mutual Funds Lumpsum: जर तुमच्याकडे एकरकमी रक्कम असेल आणि तुम्ही ती दीर्घ मुदतीत गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत. गुंतवणूक योग्य ठिकाणी केली तर त्याचा परतावाही तुम्हाला उत्तम मिळू शकतो. परंतु त्यासाठी योग्य अभ्यास असणंही गरजेचं आहे.

NSC vs FD vs Mutual Funds Lumpsum: भविष्याच्या दृष्टीने गुंतवणूक ही महत्त्वाची असतेच. आजकाल अनेक जण गुंतवणूकीला प्राधान्य देऊ लागलेत. गुंतवणूक योग्य ठिकाणी केली तर त्याचा परतावाही तुम्हाला उत्तम मिळू शकतो. परंतु त्यासाठी योग्य अभ्यास असणंही गरजेचं आहे.

जर तुमच्याकडे एकरकमी रक्कम असेल आणि तुम्ही ती दीर्घ मुदतीत गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत. पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट किंवा पोस्ट ऑफिसएफडीमध्ये तुम्ही याची गुंतवणूक करू शकता. हे दोन्ही सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय आहेत. एनएससीवर ७.७ टक्के आणि पोस्ट ऑफिस एफडीवर ७.५ टक्के व्याज मिळत आहे.

दुसरीकडे थोडी जोखीम घेऊ शकत असाल तर दुसरा मार्ग म्हणजे म्युच्युअल फंड. यात तुम्ही एकरकमी रक्कम जमा करू शकता आणि चांगल्या व्याजदराचा लाभ घेऊ शकता. परंतु म्युच्युअल फंड बाजाराशी निगडित योजना आहेत, त्यामुळे एनएससी किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनेप्रमाणे व्याजाची हमी देता येत नाही.

मात्र, दीर्घकालीन गुंतवणुकीवर सरासरी १२ टक्के परतावा मिळतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. हा परतावा कमी-अधिक ही असू शकतो. जर तुम्हीही एकरकमी रक्कम गुंतवण्याचा विचार करत असाल तर येथे जाणून घेऊ की जर तुम्ही एनएससी किंवा एफडी किंवा लंपसममध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला किती फायदा होईल?

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) सध्या ७.७ टक्के दरानं व्याज देत आहे. जर तुम्ही या योजनेत १ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला ७.७ टक्के दरानं ५ वर्षांसाठी ४४,९०३ रुपये व्याज म्हणून मिळतील. अशा प्रकारे मॅच्युरिटीवर तुम्हाला १,४४,९०३ रुपये मिळतील. आपण एनएससी प्रमाणपत्र खरेदी केल्याच्या तारखेस असलेला व्याजदर तुम्हाला ५ वर्षांसाठी मिळेल. दरम्यान, सरकारनं व्याजदरात वाढ किंवा कपात केल्यास त्याचा परिणाम तुमच्या एनएससी खात्यावर होत नाही.

पोस्ट ऑफिस एफडीमध्ये गुंतवणूक केल्यास सध्या ७.५ टक्के दरानं व्याज मिळेल. अशा परिस्थितीत जर तुम्ही १ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला ५ वर्षात ४४,९९५ रुपये व्याज म्हणून मिळतील. अशा प्रकारे तुम्हाला ५ वर्षांनंतर एकूण १,४४,९९५ रुपये मिळतील. तसं पाहिले तर एनएससी आणि एफडीची आवड कायम आहे. या दोन्ही योजनांचा एक फायदा म्हणजे तुम्हाला ८० सी अंतर्गत टॅक्स बेनिफिटही मिळणार आहे.

जर तुम्ही म्युच्युअल फंडात एकरकमी १ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर १२ टक्के अंदाजित परताव्यानुसार तुम्हाला ७६,२३४ रुपये व्याज म्हणून मिळतील. अशा प्रकारे तुम्हाला ५ वर्षात एकूण १,७६,२३४ रुपये मिळतील, जे एनएससी किंवा एफडीपेक्षा जास्त आहे. जर हा परतावा १२% पेक्षा कमी असेल तर १०% व्याजदरानुसार तुम्हाला ५ वर्षात १,६१,०५१ रुपये, ९% व्याजदरानुसार १,५३,८६२ रुपये आणि ८% व्याजानुसार १,४६,९३३ रुपये मिळतील. तर १२% पेक्षा जास्त म्हणजे १५% पर्यंत मिळाले तर ५ वर्षात ही रक्कम दुप्पट होईल. यामध्ये १५ टक्के व्याजानुसार तुम्हाला २,०१,१३६ रुपये मिळतील. अशा प्रकारे तुम्हाला एकरकमी जास्त फायदा मिळण्याची अपेक्षा आहे.

एकरकमी रकमेच्या बाबतीत आर्थिक तज्ज्ञांचं मत असं आहे की, जेव्हा तुमच्याकडे मोठं भांडवल असेल आणि तुम्हाला बाजाराची चांगली समज असेल तेव्हाच एकरकमी पैसे गुंतवावेत. यात एक छोटीशी चूकही तुमचं नुकसान करू शकते. जर तुम्ही नवीन गुंतवणूकदार असाल तर तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच त्यात पैसे गुंतवणे चांगलं.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)