कर्मचारीहिताचा मोठा निर्णय! 'गिग वर्कर्स'नाही मिळणार PF-ग्रॅच्युइटी; नवीन लेबर कोडचे ३ महत्त्वाचे फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 10:50 IST2025-11-23T10:34:52+5:302025-11-23T10:50:01+5:30
New Labour Codes India : केंद्र सरकारने देशातील श्रम फ्रेमवर्क अधिक मजबूत आणि आधुनिक बनवण्याच्या उद्देशाने २१ नोव्हेंबरपासून नवीन लेबर कोड्स लागू करण्यास सुरुवात केली आहे. या नव्या बदलांनुसार, सध्या अस्तित्वात असलेले २९ वेगवेगळे श्रम कायदे आता एकत्रित करून केवळ ४ कायद्यांमध्ये समाविष्ट केले गेले आहेत.

या नवीन बदलांमुळे कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि लाभ पूर्वीपेक्षा वाढणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यामध्ये आता गिग वर्कर्स, प्लॅटफॉर्म वर्कर्स आणि कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे.

ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याला कंपनीत सलग ५ वर्षे सेवा देणे आवश्यक होते. नवीन लेबर कोडनुसार, आता फिक्स्ड टर्म एम्प्लॉयीज आणि काही कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांना १ वर्षाची सेवा पूर्ण झाल्यावरही ग्रॅच्युइटी मिळवण्याचा हक्क प्राप्त होईल.

कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांसाठी मात्र ५ वर्षांचा नियम तसाच लागू राहील. हा बदल अनेक कर्मचाऱ्यांना फायदा देईल आणि ग्रॅच्युइटी मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढेल.

नवीन लेबर कोड लागू झाल्याने भविष्य निर्वाह निधी मिळणाऱ्या कामगारांच्या संख्येत मोठी वाढ होईल. आता केवळ पारंपरिक कर्मचारीच नव्हे, तर गिग वर्कर्स, प्लॅटफॉर्म वर्कर्स (उदा. झोमॅटो, स्विगी, ओला, उबरचे ड्रायव्हर्स), आणि फिक्स्ड टर्म कर्मचाऱ्यां नाही पीएफचा लाभ मिळेल.

यामुळे त्यांची आर्थिक सुरक्षा पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. मात्र, यासाठी संबंधित कंपनीमध्ये पीएफ कायदा लागू असणे आवश्यक आहे. कर्मचारी आणि कंपनी दोघेही पीएफसाठी रकमेचा भरणा करतील.

आता कर्मचारी २० दिवसांचे काम पूर्ण केल्यावर १ पूर्ण दिवसाच्या सुट्टीसाठी पात्र असतील. याचा अर्थ ते २० दिवसांचे काम झाल्यानंतर आपल्या नियोक्त्याकडे एका दिवसाच्या सुट्टीची मागणी करू शकतात.

या निर्णयामुळे कंत्राटी आणि स्थलांतरित कामगारांना मोठा फायदा होईल, कारण त्यांना त्यांच्या सुट्ट्या अधिक वेळेत मिळतील. हे नवीन श्रम कायदे देशातील कामगार वर्गाला अधिक सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे.

















