Nirmala Sitharaman Net Worth: कॅश, गोल्‍ड, प्रॉपर्टी... लोकसभा लढवण्यास नकार देणाऱ्या निर्मला सीतारामन यांची नेटवर्थ किती? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 09:29 AM2024-03-28T09:29:18+5:302024-03-28T10:10:58+5:30

सीतारमन यांनी भाजपाचा लोकसभा निवडणूक लढण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. त्यांनी आपल्याकडे निवडणूक लढविण्यासाठी पैसा नसल्याचं कारण दिलंय.

काही वर्षांपूर्वी कोकणातील एका प्रतिष्ठित माजी खासदारानं आपल्याकडे निवडणूक लढण्यासाठी पैसे नाहीत, असं सांगून लोकसभेची निवडणूक लढण्यास असमर्थता दर्शवली होती. तसाच प्रकार देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याबाबत घडलाय. सीतारमन यांनी भाजपाचा लोकसभा निवडणूक लढण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे.

त्यांनी आपल्याकडे निवडणूक लढविण्यासाठी पैसा नसल्याचं कारण दिलं आहे. भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांना कर्नाटक सोडून आंध्र प्रदेश किंवा तामिळनाडूमधून निवडणूक लढविण्याचा पर्याय दिला होता. यावर आठवडाभर विचार केल्यानंतर त्यांनी भाजपाला हा नकार कळवलाय. दरम्यान, निर्मला सीतारामन यांची नेटवर्थ किती आहे ते जाणून घेऊ.

मायनेता इन्फो वेबसाइटनुसार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची एकूण संपत्ती २ कोटी ५० लाख ९९ हजार ३९६ रुपये आहे. यामध्ये त्यांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. त्याच्याकडे ३१५ ग्रॅम सोनं आहे. सोन्याव्यतिरिक्त अर्थमंत्र्यांकडे २ किलो चांदीही आहे. निर्मला सीतारामन यांच्याकडे स्वतःची कार नाही. मात्र, त्यांच्या नावावर बजाज चेतक स्कूटर आहे. त्याची किंमत २८,२०० रुपये आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे हैदराबादजवळ सुमारे १६ लाख रुपयांची बिगरशेती जमीन आहे. त्यांच्या स्थावर मालमत्तेची किंमत १,८७,६०,२०० रुपये आहे. सीतारामन यांच्या नावावर ३,५०,००० रुपयांचं एक पर्सनल लोन आहे. याशिवाय ३०,४४,८३८ रुपयांचं अन्य कर्जही आहे. राज्यसभेच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी १७,२०० रुपये रोख असल्याचं सांगितलं होतं. याशिवाय बँक एफडी म्हणून ४५,०४,४७९ रुपयांची माहिती देण्यात आली.

निर्मला सीतारामन यांचा जन्म १८ ऑगस्ट १९५९ रोजी मदुराई येथे झाला. त्यांचे वडील नारायणन सीतारामन रेल्वेत नोकरी करत होते. आई सावित्री गृहिणी होत्या. निर्मला सीतारामन यांचं सुरुवातीचं शिक्षण मदुराई येथे झालं. त्यानंतर त्यांनी तिरुचिरापल्ली येथील सीतालक्ष्मी रामास्वामी महाविद्यालयातून अर्थशास्त्रात पदवी मिळवली.

सीतारामन यांनी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून अर्थशास्त्रात एमए आणि एम.फिल केलं. सीतारामन यांचे पती परकल प्रभाकर हे देखील जेएनयूचे विद्यार्थी आहेत. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतलं.

सीतारामन या भाजपच्या दिग्गज नेत्यांपैकी एक आहेत. निर्मला सीतारामन या भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत. यापूर्वी १९७०-७१ दरम्यान इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी अर्थमंत्रालयाची धुरा साभाळली होती. सीतारामन या भारताच्या वाणिज्य आणि उद्योग (स्वतंत्र प्रभार) आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री देखील आहेत. २००३ ते २००५ या काळात त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या होत्या. याशिवाय सीतारामन यांनी भाजपच्या प्रवक्त्या म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे.