टर्म प्लॅन घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी खून किंवा मृत्यू झाला तर वारसाला पैसे मिळतील का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 03:01 PM2023-06-14T15:01:08+5:302023-06-14T15:29:54+5:30

कोणतेही इनशुरन्स आपल्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मदतीच्या ठरतात.

आपले कुटुंब नेहमीच आर्थिकदृष्ट्या मजबूत असावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी अनेकजण वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतात. तर अनेकजण विमा पॉलिसींप्रमाणेच टर्म प्लॅन किंवा टर्म इन्शुरन्स घेतात.

ही योजना तुमच्या कुटुंबाला कोणतीही अनुचित घटना घडल्यास आर्थिक सुरक्षा देण्यासाठी मदत करते. गेल्या काही वर्षापूर्वी या योजनेला जास्त महत्व नव्हते पण आज विमा ही सर्वात मोठी गरज बनली आहे.

पण टर्म इन्शुरन्स घेणाऱ्यांच्यात मनात अनेक प्रकारचे प्रश्न असतात. यापैकी एक म्हणजे टर्म प्लॅन घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी पॉलिसीधारकाचा खून किंवा अन्य मार्गाने मृत्यू झाला तर वारसाला पैसे मिळतील का?

टर्म इन्शोरन्स आपल्या कुटुंबाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आर्थिक मदत करते. पण, अनेकवेळा काही परिस्थितीत टर्म इन्शोरन्सचे पैसे वारसाला मिळत नाहीत. वेगवेगळ्या विमा कंपन्यांचे मृत्यू कलम वेगळे आहेत. टर्म प्लॅनची ​​खास गोष्ट म्हणजे यात प्रतीक्षा कालावधी नसतो.

टर्म इन्शुरन्स कोणत्याही सबस्क्रायबरच्या मृत्यूनंतरच त्याच्या नॉमिनीला विम्याची रक्कम देते. सहसा या विम्याची रक्कम मोठी असते. टर्म इन्शुरन्समध्ये, नैसर्गिक, रोग किंवा अपघातामुळे मृत्यू कव्हर केला जातो.

या विम्यावर प्रतीक्षा कालावधी नाही. याचा अर्थ विमा खरेदी केल्याच्या दुसऱ्याच दिवसापासून तुम्हाला संरक्षण मिळण्यास सुरुवात होते. पण जर हे आत्महत्येचे प्रकरण असेल तर सुमारे एक वर्षाचा प्रतीक्षा कालावधी असू शकतो.

समजा एका विमा धारकाचा खून झाला आणि त्याने एक दिवस आधी मुदत विमा घेतला होता. अशा परिस्थितीतही, वारसाला संपूर्ण विम्याचा दावा मिळेल. पण जर विमाधारकाच्या हत्येतील नॉमिनीची भूमिका समोर आली किंवा त्याच्यावर खुनाचा आरोप असेल तर विमा कंपनी मुदतीच्या विम्याचे पैसे देण्यास नकार देऊ शकते. नामनिर्देशित व्यक्ती निर्दोष सिद्ध होईपर्यंत कंपनी दावा होल्डवर ठेवू शकते.

दुसरीकडे, जर विमा घेणारी व्यक्ती काही गुन्हेगारी कृतीत गुंतलेली असेल आणि त्यादरम्यान तिचा मृत्यू झाला तर विमा कंपनी विम्याची रक्कम देण्यास नकार देईल.

समजा विमा घेणाऱ्या व्यक्तीने पॉलिसी घेताना कोणत्याही गंभीर आजाराची माहिती दिली नाही. पण त्याच गंभीर आजाराने त्याचा मृत्यू होतो. या स्थितीत विमा कंपनी दावा नाकारेल. म्हणूनच टर्म प्लॅन घेताना कोणत्याही प्रकारची माहिती लपवू नका. HIV/AIDS मुळे होणारा मृत्यू टर्म इन्शुरन्स अंतर्गत येत नाही.