Ambani आता थेट Adani ला टक्कर देणार! ग्रीन एनर्जीसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 09:23 PM2021-09-03T21:23:29+5:302021-09-03T21:29:42+5:30

Reliance इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी ग्रीन एनर्जी क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

गौतम अदानी यांच्या Adani समुहातील अदानी ग्रीन एनर्जीची यशस्वी घोडदौड सुरू असून, आता Reliance इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी याच ग्रीन एनर्जी क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

हवामान बदलासंदर्भात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय जलवायू शिखल संमेलन २०२१ मुकेश अंबानी यांनी हरित ऊर्जा क्षेत्रात पाऊल टाकल्याची मोठी घोषणा केली आहे.

मुकेश अंबानी यांनी पुढील तीन वर्षात अधिक क्षमतेचे चार विनिर्माण संयंत्र लावण्यासाठी ७५ हजार कोटींची घोषणा केली असून, पुढील तीन वर्षांत प्रकल्प प्रत्यक्षात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय जलवायू शिखर संमेलनात संवाद साधणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. आत्मनिर्भर भारताचे लक्ष्य लवकरच साध्य होण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. हवामान बिघडले तर त्याचा पृथ्वीवर मोठा परिणाम होणार आहे. हवामान बदल हे सध्या जगातील सर्व देशांसाठी मोठे आव्हान आहे.

त्यापासून सुटका मिळवण्यासाठी ग्रीन एनर्जीच्या माध्यमातून वेगाने पुढे जावे लागणार आहे. भारतात एक नवी हरित क्रांती सुरू झाली आहे. हरित क्रांतीने भारताला खाद्य उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर केले आणि आताची नवी हरित क्रांती ही देशाला ऊर्जा उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर करण्यास मदत करेल, असा विश्वास मुकेश अंबानी यांनी यावेळी व्यक्त केला.

नवीन ऊर्जा वातावरणासाठी आवश्यक असलेली सर्व महत्वाची उपकरणे तयार आणि एकत्रित करण्यासाठी आम्ही चार मोठे सौर फोटोव्होल्टिक मॉड्यूल कारखाना, ऊर्जा साठवण बॅटरी कारखाना, इलेक्ट्रोलायझर कारखाना आणि इंधन सेल कारखाना निर्मिती कारखाना उभारण्याची योजना आखली आहे.

भारतात हरित क्रांतीची सुरूवात झाली असून, भारत आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. आताच्या घडीला ग्लोबल वॉर्मिंग ही सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. यापासून सुटका मिळवण्यासाठी हरित ऊर्जा हा एकमात्र पर्याय आहे, असे मुकेश अंबानी यांनी नमूद केले.

दरम्यान, जामनगरमध्ये धीरुभाई अंबानी ग्रीन एनर्जी गीगा कॉम्प्लेक्स विकसित करणार असल्याचे सांगितले होते. रिलायन्स कंपनी आता परंपरागत ऊर्जेऐवजी न्यू एनर्जी म्हणजे सोलारसारख्या ग्रीन एनर्जीवर भर देणार आहे. यासाठी रिलायन्सने न्यू एनर्जी काऊन्सिल तयार केले आहे. यामध्ये देशातील अनेक तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे.

तसेच रिलायन्सकडून सौदी अरेबियामधील मोठी तेल कंपनी ‘अरामको’सोबत १५ अब्ज डॉलर्स एवढ्या भागीदारी करण्यात येत आहे. अरामकोचे अध्यक्ष यासीर अल रुमय्या यांना कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून संचालक मंडळात स्थान देण्यात आले. रिलायन्स २० टक्के भागभांडवल अरामकोला विकणार आहे.

देशभरातील व्यवसायिकांची माहिती एकाच मंचावर संकलित करणारी Just Dial ही सर्च आणि लिस्टिंग कंपनी आहे. छोट्या मोठ्या व्यवसायिकांपर्यंत पोहोचण्यासाठी Reliance चा जस्ट डायल कंपनीसोबतचा करार पूर्ण झाला असून, आता ४०.९० टक्के म्हणजेच जवळपास ४१ टक्के हिस्सेदारी रिलायन्सकडे आली आहे.

Just Dial कंपनीतील हिस्सा खरेदीबाबत TATA समूहाकडूनही एप्रिल महिन्यात प्रयत्न करण्यात आले होते, मात्र बोलणी फिस्कटली होती. त्यानंतर Reliance समूहाने यात एंट्री घेतली आणि करार पूर्णत्वास नेला असून, आता ४०.९० टक्के म्हणजेच जवळपास ४१ टक्के हिस्सेदारी रिलायन्सकडे आली आहे.

Reliance ने Just Dial मधील हिस्सा खरेदीसाठी तब्बल ३ हजार ४९७ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर Just Dial वर Reliance नियंत्रण असेल, असे सांगितले जात आहे.