MSSC : ₹५०,०००, ₹१०००००, ₹१५००००, ₹२००००० च्या गुंतवणुकीवर महिलांना किती होणार फायदा? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 08:53 AM2024-03-11T08:53:25+5:302024-03-11T09:00:31+5:30

या योजनेत महिला किमान १००० रुपये आणि कमाल २ लाख रुपये गुंतवू शकतात. दोन वर्षांनी योजना मॅच्युअर होईल आणि संपूर्ण पैसे व्याजासह मिळतील.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी एक वन टाईम डिपॉझिट स्कीम आहे. सरकार ही योजना महिलांसाठी चालवत आहे, जेणेकरून त्यांना या योजनेद्वारे त्यांच्या ठेवींवर आकर्षक व्याजदराचा लाभ घेता येईल. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेत महिलांना ७.५ टक्के दरानं व्याज मिळत आहे.

एमएसएससी योजनेत महिला किमान १००० रुपये आणि कमाल २ लाख रुपये गुंतवू शकतात. दोन वर्षांनी योजना मॅच्युअर होईल आणि संपूर्ण पैसे व्याजासह मिळतील. जर तुम्हालाही या सरकारी हमी योजनेत गुंतवणूक करायची असेल, तर जाणून घेऊ की तुम्हाला ₹५००००, ₹ १०००००, ₹ १५०००० आणि ₹ २००००० च्या गुंतवणुकीवर किती फायदा होईल.

महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही या योजनेत ५०००० रुपये गुंतवले तर तुम्हाला त्यावर दोन वर्षांत ८०११ रुपये व्याज मिळतील आणि अशा प्रकारे मॅच्युरिटीवर मिळणारी एकूण रक्कम ५८,०११ रुपये होईल. जर तुम्ही यामध्ये १,००,०० रुपये गुंतवले तर ७.५ टक्के व्याजदरानं तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी १,१६,०२२ रुपये मिळतील.

जर तुम्ही १,५०,००० रुपये जमा केले तर तुम्हाला दोन वर्षांनी १,७४,०३३ रुपये मिळतील, म्हणजेच तुम्हाला यावर २४,०३३ रुपये व्याज म्हणून मिळतील आणि जर तुम्ही या योजनेत २,००,००० रुपये गुंतवले तर त्यावर ७.५ टक्के व्याज मिळेल. यानंतर तुम्हाला गुंतवलेल्या रकमेवर व्याज म्हणून ३२,०४४ रुपये मिळतील. अशा प्रकारे तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण २,३२,०४४ रुपये मिळतील.

तुम्हालाही महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकांमध्ये खातं उघडू शकता. कोणत्याही वयोगटातील महिला यामध्ये गुंतवणूक करू शकतात. अल्पवयीन मुलीच्या नावानं पालकांना खातं उघडता येतं. खातं उघडताना, तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड आणि फोटो इत्यादी केवायसी कागदपत्रांची आवश्यकता असेल.

नियमांनुसार, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत १ वर्ष पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला आंशिक पैसे काढण्याची परवानगी मिळते. अशा परिस्थितीत तुम्ही जमा केलेल्या रकमेपैकी ४० टक्के रक्कम काढू शकता. म्हणजेच तुम्ही २ लाख रुपये जमा केले असतील तर एका वर्षानंतर तुम्ही ८० हजार रुपये काढू शकता.